आरंभ मराठी / तुळजापूर
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे गेल्या काही दिवसांपासून शहराच्या सौंदर्यावर परिणाम करणाऱ्या अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट वाढला असून, यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या नजरेतही या प्रकारामुळे शहराची नकारात्मक प्रतिमा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवरील पथदिव्यांच्या खांबांवर हे बॅनर लावण्यात येत असल्याने वाहनचालकांसाठी मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोड, धाराशिव रोड तसेच इतर मुख्य मार्गांवरील डिव्हायडरवरील पथदिव्यांच्या पोलवर कोणतीही परवानगी न घेता हे बॅनर लावण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक वेळा वाहनचालकांना समोरील वाहन स्पष्टपणे दिसत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा वळणाच्या ठिकाणी या बॅनरमुळे दृष्टीआड होऊन अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, नगरपरिषद याकडे दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नगरपरिषदेकडून कोणतीही परवानगी न घेता हे बॅनर लावले जात असल्याने, भविष्यात एखादा गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवर्षी नगरपरिषदेकडून बॅनर संदर्भात नियमावली तयार करण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत त्या नियमावलीचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोणत्याही बॅनरवर क्यूआर कोड नसल्यामुळे त्यांची वैधता तपासणेही कठीण झाले असून, प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे.
दरम्यान, अनधिकृतरीत्या लावण्यात आलेले हे बॅनर वाऱ्याच्या वेगामुळे अनेकदा खाली पडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक बॅनर कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बॅनर कोसळल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे बॅनर संपूर्ण शहरभर मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत.
नळदुर्ग रोड आणि धाराशिव रोडवरील डिव्हायडरच्या मधोमध हे बॅनर लावण्यात आल्याने वाहनधारकांना वाहन दुसऱ्या बाजूला घेताना समोरील वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला असून निष्पाप नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर तुळजापूर नगरपरिषदेकडून तात्काळ कारवाई करून अनधिकृत बॅनर हटवावेत, तसेच संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.









