आरंभ मराठी / धाराशिव
32 वर्षीय महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि.27) ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (नाव व गाव गोपनीय) ही दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पायी चालत तुळजापूरकडे जात होती.
त्यावेळी तिच्या गावातीलच एका तरुणाने “चल, तुला तुळजापूर येथे सोडतो,” असे सांगून विश्वास संपादन केला आणि तिला मोटरसायकलवर बसवून घेतले. मात्र, तुळजापूरकडे न नेता आरोपीने तिला एका शेतात, ज्वारीच्या पिकामध्ये नेले.
तेथे आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत, तिचे तोंड दाबून ठेवले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडित महिला प्रतिकार करू शकली नाही.
आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार महिलेने दिली आहे. घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ तामलवाडी पोलीस ठाणे गाठून प्रथम खबर दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 351(2), 351(3) तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम 3(2)(व्ही), 3(2)(व्हीए) आणि शस्त्र अधिनियम कलम 3 व 25 अन्वये गंभीर गुन्हा नोंदवला आहे. पोलीसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून पुढील तपास तामलवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.









