आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५५ आणि पंचायत समितीच्या ११० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत एकूण ६५.२२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे आज जाहीर होणाऱ्या निकालांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील एकूण ११ लाख ४५ हजार ८८८ मतदारांपैकी शनिवारी ७ लाख ४७ हजार ३७० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३ लाख ९९ हजार ६४९ पुरुष तर ३ लाख ७४ हजार ७१७ महिला मतदारांचा समावेश आहे.
या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अनेक ठिकाणी काट्याची लढत पाहायला मिळणार असून, काही मतदारसंघांमध्ये आघाडीतीलच घटक पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती रंगल्या आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दोन्ही बाजूंनी मोठ्या जोरात प्रचार करण्यात आला होता.
जिल्हा परिषदेच्या ५५ जागांमध्ये भूम ५, वाशी ३, कळंब ८, धाराशिव १२, परंडा ५, तुळजापूर ९, लोहारा ४ आणि उमरगा ९ जागांचा समावेश आहे. तर पंचायत समितीच्या ११० जागांमध्ये भूम १०, वाशी ६, कळंब १६, धाराशिव २४, परंडा १०, तुळजापूर १८, लोहारा ८ आणि उमरगा १८ जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेत सकाळी दहा वाजता प्रथम टपाली मतदानाची मोजणी करण्यात येणार असून, त्यानंतर गटनिहाय व गणनिहाय मतमोजणी करून निकाल घोषित केले जाणार आहेत. यासाठी धाराशिव येथे २४, तुळजापूर १४, उमरगा १८, लोहारा १०, कळंब १५, वाशी ६, भूम १४ आणि परंडा १४ अशा एकूण मतमोजणी टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थक सकाळपासूनच मतमोजणी केंद्रांवर गर्दी करताना दिसत आहेत.
काही उमेदवारांनी तर निकालाच्या अपेक्षेने गुलाल आणि फटाक्यांची तयारीही आधीच करून ठेवली आहे. सकाळी साडेदहानंतर निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल, तर दुपारी एक वाजेपर्यंत बहुतांश निकाल स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता येणार, याचे चित्र आज दुपारपर्यंत पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.









