विशेष प्रतिनिधी / मुंबई
बार्टी संस्थेमार्फत राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या मूलभूत प्रशिक्षणामध्ये मोठा घोळ असून सरकार त्यावर काहीच निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाने मंगळवारी विधान सभेत सभात्याग केला.
प्रश्नोत्तराच्या तासात भाजपचे आशिष शेलार यांनी बार्टी राबवत असलेली कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरळीत नाहीत,त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे असा प्रश्न उपास्थित केला,
सरकारने दिलेले उत्तर अपूर्ण होते,हे प्रकरण न्यायालयात असल्याचे उत्तर दिशाभूल करणारे असून जे विचारले नाही त्याची उत्तरे सरकार का देते ?अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी केली.
मंत्री शंभूराज देसाई उत्तर देण्याचा प्रयत्न करीत होते मात्र त्याने सदस्यांचे समाधान होत नव्हते.काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मंत्र्यांना ताकीद देण्याची मागणी केली. मंत्री तयारी करून सभागृहात येत नाहीत,त्यांना सांभाळून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री याना मदतीला यावे लागते ही नामुष्की असल्याचे थोरात म्हणाले.
यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिल्यावर पुढचा प्रश्न पुकारण्यात आला ,मात्र हा आमच्यावर अन्याय असल्याचे सांगत विरोधी पक्षाने सभात्याग केला.