योगराज पांचाळ/ दहिफळ
कळंब तालुक्यातील दहिफळ परिसरात अल्प पावसावर सोयाबीन पिकाची १०० टक्के पुर्ण झाली असून, शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होता.मंगळवारी परिसरात समाधानकारक पाऊस पडला असून त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. जमीनीत थोडी ओल असतानाच पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. पेरणी झाल्यापासून अपेक्षित प्रमाणात पाऊस पडला नव्हता.जवळपास पावसाने तेरा दिवस दडी मारली होती.
थोड्याशा ओलीवरच शेतकऱ्यांनी पेरणी केली.पिकांना अंकुर फुटले होते. सोयाबीन शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावणारे पिक आहे.शंभर टक्के सोयाबीन पिकाची पेरणी या भागात होते.गेल्या वर्षी अपेक्षित भाव मिळाला नाही.त्यात रोगराई वाढली, गोगलगायचे संकट उभे राहिले. दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती.
यंदा तरी उत्पादन वाढेल अशी अपेक्षा असताना तब्बल एक महिना उशीरा पाऊस पडला.तोही अपुरा. या अल्प पावसावर सोयाबीन पिकाची पेरणी करावी लागली.तेरा दिवसाच्या प्रतिक्षेनंतर परिसरात भिज पाऊस पडला असून, कोमेजलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसत आहे. भूजल पातळीत वाढ होण्यासाठी अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.