प्रतिनिधी / धाराशिव
आनंदून गेला, आनंद सारा, बाल आनंद बाजाराचा उत्साह न्यारा…! या ओळींना सुसंगत बाल मेळावा तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे शनिवारी (दि.30)आयोजित करण्यात आला होता. यात लहानांपासून आबालवृद्ध आनंदून गेले होते. या मेळाव्यात मुलांनी व्यापाराचे ज्ञान घेतले आणि हजारो रुपयांची उलाढाल झाली.
सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 पर्यंत प्रा.शा.पांगरदरवाडी येथील मैदानावर आनंदबाजाराचे आयोजन करण्यात आले. या आनंदबाजारात शाळेतील विद्यार्थ्यांनी पालेभाज्या, फळभाज्या, मिठाईची तसेच विविध खाद्यपदार्थांची, मनोरंजनात्मक खेळ व शालेय साहित्यांची वेगवेगळी दुकाने मांडली होती. सरपंच सिंधू पोफळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ शिंदे, उपाध्यक्ष किरण शिंदे, प्रताप निंबाळकर, रघुनाथ मारडकर या मान्यवरांच्या हस्ते आनंद बाजाराचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू आदी पालेभाज्या तसेच टोमॕटो, बटाटे, मिरची, कांदे, घेवडा, मटार आदी फळभाज्यांची दुकाने मांडली. पेरु, लिंबू, बोरे, पपई यांसारखी फळे विक्रीस ठेवली होती. इडली-सांबर, ढोकळा, उडीद-वडे, आप्पे, दहीवडा, यांसारख्या दाक्षिणात्य खाद्यपदार्थासोबत मिसळपाव, पाव वडा, पॕटीस, बटाटेवडा, अळुवड्या, बाकरवडी, शाबुवडा, पावभाजी, समोसे, कोथिंबीर वड्या, चिरोटे, फरसाण,भजी, पाणीपुरी, भेळ यांसारखे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थसुद्धा विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. तसेच गुलाबजाम, बासुंदी, बालुशाही, सोनपापडी इ.मिठाई व चहा-काॕफीच्या दुकानांनी बाजार अधिकच फुलून गेला होता. यावेळी बालविक्रेत्यांनी मांडलेल्या आनंदबाजारात खरेदी करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली. नागरिक व पालक यांनी सदरील आनंदबाजार हा उपक्रम आमच्यासाठी नवा असून, तो आनंद व मनाला समाधान देणारा वाटला, अशा प्रतिक्रिया नोंदवल्या. तर व्यावहारिक ज्ञानाचे कृतिशील शिक्षण मिळावे, विद्यार्थ्यांना व्यवहारातील जमा-खर्चाचा ताळेबंद समजावा. व्यवहारातील नफा-तोटा याचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे व भावी आयुष्यातील विद्यार्थ्यांची व्यावसायिक जडणघडणीसाठी सदरील उपक्रमाचे शाळास्तरावर आयोजन करण्यात आल्याचे शाळेतील शिक्षकांनी सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उत्रेश्वर पैकेकरी यांचेसह शाळेतील सर्व शिक्षकांनीही आनंदबाजारात विद्यार्थ्यांचेकडून वस्तू व पदार्थ खरेदी केले. आनंदबाजारातून बालविक्रेत्यांनी हजारो रुपयांची उलाढाल केली. यावेळी खरेदी व विक्री करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अनोखा आनंद दिसून येत होता. तसेच पावभाजी ठेल्यावर आणि फुटाणे विक्री सेंटरवर अशा दोन ठिकाणी फोनपे व पेटीएमच्या माध्यमातून डिजीटल पेमेंटच्या सुविधेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यानिमित्ताने मुलांना डिजीटल व कॅशलेस व्यवहाराची ओळख झाली.