गजानन तोडकर / कळंब
एकीकडे प्रत्येक क्षेत्रात ताणतणाव वाढत असताना व तणाव दूर करण्यासाठी वेगवेगळ्या नशा केल्या जात असताना आता अल्पवयीन मुलांमध्ये देखील नशा करण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे अनेक पालकांना आपले पाल्य नशा करत असल्याचे ज्ञात नाही. त्यामुळे नवीन पिढीमध्ये नैराश्य, ताणतणावासोबत मानसिक आजार बळावण्याची शक्यता आहे. कळंब शहरात अनेक अल्पवयीन मुले स्टिकफास्टचा (सुलोचन) नशेसाठी वापर करत असून, अशा मुलांचे वेळीच समुपदेशन करण्याची गरज मानसोपचार तज्ञ व्यक्त करत आहेत.
व्यसनांच्या प्रकारात तंबाखू, सिगारेट, दारू, ड्रग्ज यांसारख्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील मात्र तुम्ही कधी हे ऐकलं नसेल की, ‘स्टिकफास्ट’ ची देखील नशा केली जाते.।कळंब शहरात तरुण मुले हे नशा करण्यासाठी सुलोचनचा वापर करत आहेत. हे सुलोचन शहरात अगदी सहज मिळते, नशा करण्यासाठी वापरले जाणारे सुलोचन साधारणतः गाडी टायर पंक्चर काढन्यासाठी वापरले जाते व ते अगदी सहज सायकल स्टोअर किंवा स्टेशनरी दुकानात मिळते तेही फक्त चहाएवढ्या रुपयात. कळंब शहरात अनेक शाळकरी मुले प्रामुख्याने या प्रकारची नशा करतांना आढळून येत आहेत.
अशी होते व्यसनाची सुरूवात
कळंब शहरात तसेच ग्रामीण भागात शाळकरी मुले व्यसनाच्या विळख्यात सापडत आहेत.एकमेकांचे अनुकरण करून पहिल्यांदा स्टिकफास्ट एका प्लास्टिक पिशवीत टाकून त्याची नशा-तोंडाद्वारे याची नशा केली जाते. ही नशा एवढी प्रचंड मोठी आहे की त्यातून अशा मुलांच्या जीवितास धोकाही उद्भवू शकतो. निर्जन ठिकाणी शाळकरी मुले सोल्युशन, नेलपॉलिश, बूट पॉलिशचा वास घेऊन नशा करताना दिसतात. केमिस्टच्या दुकानात वैद्यकीय सल्ल्याशिवाय विकल्या जाणार्या आयोडेक्स, मूव्ह आणि अल्कोहोलिक सिरप आणि झोपेच्या गोळ्यांचाही नशा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
यावर प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे.तसेच पालकांनी आपल्या पाल्याना विश्वासात घेऊन अशा व्यसनापासून परावृत्त करण्याची गरज आहे,असे मानसोपचार तज्ञांचे मत आहे. कळंब शहरातील काही डॉक्टरांशी बोलताना सांगितले की, मुलांमध्ये अशा व्यसनांचे प्रमाण वाढते आहे हे वास्तव असून, त्यातून शरीराला थेट धोका आहेच पण त्यापेक्षाही मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे मुलांना अशा प्रकारापासून दूर राहण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे.
डॉक्टर म्हणतात…
अशा सेवनाने मुलांमध्ये ताणतणाव वाढतो, नैराश्य येते. वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजारही होतात. व्यसन अती झालं की, आत्महत्येची प्रवृत्ती येते. त्यामुळे हे गंभीर आहे.सुलोचन- स्टीक फास्टची नशा ही शरीरासाठी गांजा आणि दारूच्या नशेपेक्षा घातक आहे.