मुक्या प्राण्यांचा जीव होतोय कासावीस,
रामलिंग परिसरात माकडांना बिसलरीच्या पाण्याचा मोह
संकलन; आनंद वीर, छायाचित्र; गोपाळ लवटे
पावसाने पाठ फिरवली आणि इथल्या बळीराजाचा जीव कासावीस झाला आहे. महिन्यापासून खरीप पिकांना पावसाची आस लागली आहे. अशा परिस्थितीत पाऊस लांबणीवर पडत आहे. परिणामी पिके करपत आहेत तर पाण्याचे स्रोत आटत असल्याने मुक्या जीवांचा घसा कोरडा पडत आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील श्रीक्षेत्र रामलिंग परिसरातील उपरोक्त छायाचित्र मनाला चटका लावणारं आणि निसर्गाला साद घालणारं आहे.
त्याचं झालं असं की, नेहमीप्रमाणे येडशी येथील निसर्गमित्र श्री गोपाळ लवटे आणि पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर बेद्रे हे रामलिंगला दर्शनासाठी निघाले होते.
पावसाळ्यात देखील रखरखणाऱ्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. चालून थकवा जाणवल्यावर या दोन मित्रांना तहान लागली. त्यांनी लागलीच पाण्याची बाटली विकत घेतली. पायऱ्यांवरून खाली उतरत उतरत विसावा घेत त्यांनी पाणी पिण्यास सुरुवात केली. पण नेमकं त्याचवेळी एक दोन वानरराज अवतीभवती घुटमळत होते. नेहमीप्रमाणे त्यांना वाटलं की ही माकडे खाऊसाठी शोधमोहीमेवर आहेत. पण पाहिल्यावर लक्षात आलं की, या माकडांना तहान लागली आहे आणि ती व्याकुळ नजरेने पाण्याच्या बाटलीकडे पाहत आहेत. लवटे आणि बेद्रे या दोन्ही मित्रांनी लागलीच पाणी बाटली माकडांकडे सुपूर्द केली. माकडांनी मनसोक्तपणे बाटलीतील पाण्याचे सेवन केले. पाण्याचा शेवटचा थेंब संपेपर्यंत बाटली सोडली नाही. नेमका यावेळी गोपाळ लवटे यांनी हा भावणारा प्रसंग कॅमेऱ्यात टिपला. तसेच शक्य त्या क्षमतेनुसार माकडांना खाऊ देखील दिला.
घटना सांगण्याच तात्पर्य हे की कमी पाऊस कमी झाल्यामुळे यंदा पाण्याचे प्रवाह खळखळत नाहीत. जलसाठ्यांमध्ये दरवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा दिसून येतो आहे. भर पावसाळ्यात ही परिस्थिती असेल तर येणाऱ्या काळात या निष्पाप जीवांच काय होईल,या भीतीने काळजात धस्स होतं..
रामलिंग अभयारण्य परिसरात शेकडो माकडांसह, मोर, विविध जातीच्या चिमण्या, ससे कोल्हे, तरस, हरणे यासह अनेक प्रकारच्या पशू पक्षांचा अधिवास आहे.
मुक्या जीवांना अन्नपाणी सेवाभाव देणारी व्यवस्था भेटेल का हा मोठा प्रश्न आहे. निसर्गा आता तू तरी निष्ठुर होऊ नकोस. या मुक्या जीवांची तरी दया येऊ दे.आणि मनसोक्त बरस.
आता होऊ दे आबादानी..