पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज माढा येथे शिवसेनेचा भव्य मेळावा
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिवचे माजी पालकमंत्री आणि भूम-परंड्याचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांना पक्षाकडून पुन्हा बेदखल केल्याचे दिसत आहे. आज सोलापूर शिवसेनेतर्फे सोलापूर शहरात शिवमेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात सोलापुरातील सर्व माध्यमांमध्ये या शिव मेळाव्याच्या जाहिराती देण्यात आल्या आहेत. तसेच सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र या मेळाव्याचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. परंतु, या सर्व जाहिरातीतून माजी मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांना बेदखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे डॉ.तानाजी सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजीराव सावंत यांनीच या सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावरून डॉ. सावंत यांना पक्षातूनच नव्हे तर कुटुंबातूनही एकटे पाडले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
सातत्याने वादग्रस्त विधान करून टीकेचे धनी ठरलेले डॉ.सावंत हे महायुतीच्या नवीन सरकारमध्ये मंत्री म्हणून दिसले नाहीत. दुसरीकडे अल्प मतांनी निवडून आलेले सावंत निकालापासून अद्याप मतदारसंघाकडे किंवा धाराशिव जिल्ह्यात फिरकले नाहीत.एकीकडे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले सावंत भूम,परांडा, वाशी विधानसभा मतदारसंघावरही प्रचंड नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा एक मुलगा थायलंडला निघून जाताना सरकारने परत फिरवलेले विमान आणि यासंदर्भातील प्रकरणामुळे सावंत पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले होते.पण, त्यांच्या नाराजीचा फटका मतदारसंघाला बसत असून, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला देखील त्यांनी हजेरी लावली नाही.त्यामुळे पक्षात आणि मतदारांवर नाराज असलेल्या डॉ.सावंत यांच्यावर मात्र शिवसेना पक्ष आणि घरातील सदस्य देखील नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.कारण आज सोलापुरात होत असलेल्या मेळाव्याच्या जाहिरातीत डॉ सावंत यांना वगळण्यात आले आहे.
जाहिरातींमध्ये एकनाथ शिंदे, प्रा. शिवाजीराव सावंत, त्यांचे दोन चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो आहेत. या प्रमुख फोटोंसह सोलापूर जिल्ह्यातील छोट्या मोठ्या ७० पदाधिकाऱ्यांचे फोटो देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सोलापूरचे पालकमंत्री भाजपचे जयकुमार गोरे यांचाही फोटो यामध्ये असताना डॉ.तानाजीराव सावंत यांनाच यातून वगळल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एकेकाळी होता दरारा,आता छोट्या कार्यकर्त्यांनाही पडतोय विसर
शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर डॉ.तानाजी सावंत यांचा विशेषतः धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात प्रचंड दरारा निर्माण झाला होता.किंबहुना शिवसेना पक्ष फोडण्यासाठी शे दीडशे बैठका घेणारे सावंत पक्षातील कुणाला कोणतं पद द्यायचं हेही ठरवत होते. त्यांनी शिवसेनेतील अनेक निष्ठावान, जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून मर्जीतील नवख्या कार्यकर्त्यांना पक्षातील पदे दिली.आता मात्र पक्षानेच त्यांना बाजूला केल्याने कुटुंबातून देखील त्यांच्या मर्जीशिवाय पक्षाचे जाहीर कार्यक्रम सुरू झाले आहेत.मागील महिन्यात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे धाराशिव दौऱ्यावर आल्या असता त्यांच्याही स्वागताच्या होर्डिंग्जवर डॉ.तानाजीराव सावंत यांना स्थान देण्यात आले नव्हते.
सहा महिन्यांपूर्वी आरोग्यमंत्री राहिलेल्या सावंत यांना यावेळी मंत्रीपद न दिल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या सहा महिन्यात ते एकदाही त्यांच्या विधानसभा मतदारसंघात फिरकले नाहीत. शिवाय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला देखील त्यांनी दांडी मारली होती. एकूणच माजी मंत्री डॉ.तानाजी सावंत यांना जिल्हा स्तरावरून तसेच राज्य स्तरावरून बेदखल करण्यात येत असून, आता त्यांच्या भावानेच बेदखल केल्यामुळे याची जास्त चर्चा होत आहे.