आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने काल धाराशिव येथे मेळावा घेऊन घटक पक्षांसोबत ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार राणा पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह महायुतीतील छोट्या-मोठ्या सर्व घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्यात पालकमंत्री सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर थेट टीका करताना, त्यांना आत्ताच माजी खासदार असे संबोधून ते पुन्हा निवडून येणार नाहीत, असे सांगितले. पडलेल्या आमदाराला मी खासदार केले होते, ती चूक होती हेही त्यांनी भाषणात सांगितले.तर बाहेरचा उमेदवार चालणार नाही हेही त्यांनी निक्षून सांगितले. वास्तविक हा बाहेरचा उमेदवार कोण,याचीच चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
महायुतीच्या मेळाव्यात मंचावरील नेते पाहिले तर महायुतीची प्रचंड मोठी ताकद दिसून येते. जिल्ह्यातील आर्थिक क्षमता असणारे सर्व मोठे नेते महायुतीकडे असल्याचे दिसून येते. परंतु महायुतीचा उमेदवार कोण? हे अजूनही ठरलेले नसल्यामुळे सध्या संभ्रमाची स्थिती दिसत आहे. महायुतीच्या प्रमुख तीनही पक्षांचा धाराशिवच्या जागेसाठी आग्रह आहे. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर सोशल मीडियावर आताच झळकत आहेत. महायुतीमध्ये ही जागा कुणाला सुटणार हे अजूनही ठरलेले नसताना शिंदे गटाने या जागेवर आपला दावा सांगितला आहे. भाजपा देखील या जागेसाठी आग्रही आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादीकडून लढलेले आमदार राणा पाटील भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपला ही जागा हवी आहे. परंतु राणा पाटील स्वतः लोकसभेसाठी इच्छुक आहेत का? याबद्दल शंका आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने या जागेवर दावा केला असला तरी लोकसभा निवडणुकीसाठी तेवढ्या ताकदीचा उमेदवार राष्ट्रवादीकडे दिसत नाही. एकूणच महायुतीच्या मेळाव्यात राजकीय ताकद दिसत असली तरी निवडणुकीच्या दृष्टीने पाहिल्यास परिस्थिती फारशी बरी दिसत नाही.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे दोनच महिने हातात असताना महायुतीमध्ये ही जागा कोणता पक्ष लढवणार, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षातील एकही नेता लोकसभेच्या दृष्टीने तयारी करत असल्याचे सध्या तरी दिसत नाही. धाराशिव लोकसभेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कालच्या मेळाव्यात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत उपस्थित होते. परंतु औशाचे आमदार अभिमयू पवार उपस्थित नव्हते. या दोन्ही तालुक्यांची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. महायुतीच्या मेळाव्यात सर्व घटक पक्षांचे नेते मांडीला मांडी लावून बसलेले दिसत असले तरी उमेदवारी जाहीर झाल्यावर ही एकी कितपत टिकेल, याबद्दल शंका येते. आमदार राणा पाटील आणि पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले आणि सुरेश बिराजदार वर्षानुवर्षे एकमेकांचे विरोधक राहिलेले आहेत. स्वतःची उमेदवारी स्वतःच जाहीर करणारे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड दुर्लक्षित झाल्याचे चित्र आहे. त्यांना संभाव्य उमेदवार म्हणूनही पाहिले जात नाही. अशावेळी ते कोणती भूमिका घेतात हे पहावे लागेल. नाही म्हटले तरी रवींद्र गायकवाड यांचा स्वतःचा मतदार मोठ्या प्रमाणावर आहे.
दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडण्याचे जवळपास निश्चित झालेले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हेच पुन्हा एकदा उमेदवार असतील हे ही निश्चित आहे. त्या दृष्टीने ओमराजेंनी मागच्या सहा महिन्यापासूनच लोकसभेची तयारी सुरू केल्याचे दिसून येते. दांडगा जनसंपर्क आणि तळागाळातील लोकांशी जोडलेली नाळ ही ओमराजेंनी ताकद आहे. सामान्यातील सामान्य माणूसही ओमराजेंनी कधीही आणि कुठेही भेटू शकतो, आणि आपली समस्या सांगू शकतो. लोकांनी मांडलेल्या समस्येचे निराकरण झाले अथवा नाही यापेक्षा खासदार स्वतः होऊन आपली समस्या ऐकून घेतो, आपला फोन उचलतो ही बाब लोकांसाठी समाधानाची असते. लोकांचे हे समाधान हीच ओमराजेंनी ताकद आहे. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील ज्याप्रकारे निष्ठेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे त्यांचे नाव राज्यभर गाजले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला मानणारा पारंपारिक शिवसेनेचा मतदार खूप मोठ्या संख्येने धाराशिव जिल्ह्यात आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर हा मतदार दुसरीकडे गेला असेल ही शक्यता फार कमी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट जिल्ह्यात आजही दिसून येते. याच लाटेवर स्वार होऊन आपण जिंकू शकतो हा विश्वास ओमराजेंना वाटतो.
२०२० पासून पीकविम्याचा प्रश्न हा जिल्ह्याच्या राजकारणात अतिशय कळीचा मुद्दा आहे. हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून ओमराजे एक वर्षापासून वारंवार पीक विम्याच्या मुद्द्यांवर आणि मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका करत आहेत. पीएम किसान योजनेचे जिल्ह्यातील दीड लाखांपेक्षा जास्त लाभार्थी मागच्या दोन वर्षात वगळले गेलेले आहेत. सततच्या पावसाचे अनुदान, २०२० पासूनच्या प्रलंबित पिकविम्याचे हप्ते, शेतमालाला विशेषतः सोयाबीनला अपेक्षित भाव न मिळणे, कांदा निर्यात बंदी या मुद्द्यांवरून मोदी सरकार विरोधात ओमराजेंनी मागच्या एक वर्षापासून मोठ्या प्रमाणात रान उठवलेले आहे. २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने एक लाखाच्या आसपास मते मिळवली होती.
यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची ताकद उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्यामुळे त्याचा फायदा ओमराजेंना होऊ शकतो. सध्या महायुतीच्या तुलनेत इंडिया आघाडीचे ओमराजे आघाडीवर दिसत असले तरी मागच्या वेळी त्यांच्यासोबत असणारी मोदी लाट आणि डॉ .तानाजी सावंत यांची आर्थिक ताकद यावेळी त्यांच्या विरोधात असणार आहे, हे विसरून चालणार नाही. धाराशिव जिल्ह्यात इंडिया आघाडीच्या घटक पक्षात योग्य समन्वय दिसून येत आहे. महायुतीची जागा कोणत्या पक्षाला सुटणार, हेच अजून ठरलेले नसल्यामुळे महायुतीची एकजूट कितपत टिकणार हे आताच सांगता येणार नाही. भाजपने तीन महिन्यांपूर्वी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये ओमराजेंच्या बाजूने जनमत असल्याचे दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपा स्वतः ही जागा न लढवता, शिंदे गटाला ही जागा देऊ शकते आणि ही शक्यता जास्त वाटते. महाराष्ट्राच्या ४८ लोकसभा मतदारसंघापैकी धाराशिव लोकसभा निवडणूक ही कांटे की टक्कर असणार आहे. पुढील काळात जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
– सज्जन यादव,धाराशिव