धाराशिव जिल्ह्यात निकालाची परिस्थिती संमिश्र
टीम आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला वेग आला असून, सुरुवातीच्या फेऱ्यांतील निकालांमधून जिल्ह्याचे राजकीय चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. अपेक्षेप्रमाणे काही ठिकाणी सत्ता परिवर्तनाची चिन्हे दिसत असली, तरी संपूर्ण जिल्ह्यात संमिश्र निकाल समोर येत आहेत.
धाराशिव तालुक्यात काही महत्त्वाच्या गटांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने बाजी मारत आपली ताकद दाखवली आहे.
कळंब तालुक्यात मात्र निकाल विभागले गेले असून, काही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार तर काही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. वाशी, भूम आणि परंडा तालुक्यांमध्ये शिवसेनेचा प्रभाव ठळकपणे जाणवत असून, आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची दमदार वाटचाल सुरू असल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा तसेच इतर काही जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर असून, या तालुक्यात भाजपची पकड कायम असल्याचे दिसते. एकंदर आतापर्यंतच्या निकालांवर नजर टाकली असता जिल्ह्यात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत नाही.
कळंब तालुक्यातील आठ जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समिती जागांचे निकाल जाहीर होत असून, पहिल्याच फेरीत ईटकुर जिल्हा परिषद गटातून शिवसेना (शिंदे गट) चे अनंत लंगडे हे सुमारे दोन हजार मतांनी विजयी झाले. ईटकुर पंचायत समिती गणातून भाजपचे नानासाहेब सांगळे यांनी विजय मिळवला, तर मस्सा खंडेश्वरी येथून शिवसेना (शिंदे गट) च्या सौ. राजश्री धनंजय वरपे यांनी बाजी मारली. ढोकी जिल्हा परिषद गट तसेच दोन्ही पंचायत समिती जागांवर शिवसेना (उबाठा) च्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पारगाव जिल्हा परिषद गटात शिवसेना (शिंदे गट) च्या स्वाती तळेकर या सुमारे १७०० मतांनी विजयी ठरल्या.
वाशी तालुक्यात सरमकुंडी पंचायत समिती गणातून शिवसेना (शिंदे गट) चे प्रवीण गायकवाड यांनी विजय मिळवला आहे. तसेच आनाळा आणि शेळगाव सर्कलमधील दोन्ही जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे चारही सर्कल आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जिंकत आपला दबदबा कायम ठेवला आहे. मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, अंतिम सत्ताकारण कोणाच्या हाती जाणार हे चित्र आणखी काही तासांत स्पष्ट होणार आहे.









