प्रतिनिधी / शिराढोण
शिराढोण (ता.कळंब) येथील ख्वॉजा नसीरोद्दीन प्राथमिक शाळेत कोणत्याही लोकसहभागाची वाट न पाहता स्वत: शिक्षकच वर्गणी गोळा करून शाळेसाठी पायाभूत सुविधा तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशही वाटप करतात. दरवर्षी 1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षक वर्गणीतूनच मोफत गणवेश दिले जातात.
शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजन करून गावातील माजी जि. प. सदस्य शहाजीराव पाटील, ऍड. नितीन पाटील, कुमार पाटील, शैलेंद्र पाटील, वरून पाटील, विशाल सोनके, निलेश नाईकवाडे, अवधूत पाटील, रणजित गवळी, नासेर पठाण, बिलाल पठाण, पंकेश पाटील, गणेश महाजन, गोवर्धन जोशी आदी शिक्षण प्रेमी नागरिक तसेच पालकांच्या हस्ते शिक्षकांनी शाळेतील 120 विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे तसेच गुणवत्तेच्या दृष्टीने येथील सर्वच शिक्षक आर्थीक सहकार्यासोबतच सातत्याने आपले कर्तव्य बजावत असतात. सर्वत्र लोकहभागाची चळवळ सुरू असताना येथील शिक्षकांनी पुढकार घेवून लोकसहभाग जमा न करता स्वत:च वर्गणी गोळा करून शाळेत विविध बदल घडवून आणल्याने शिक्षकांचे कौतुक होत आहे. दरवर्षी या शाळेत शिक्षक वर्गणीतून गणवेश वाटपसाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत महाजन, राजेश्वर पाटील, बालाजी नाडे व महेबूब मेंडके हे पुढाकार घेतात.
विविध कलागुणांना वाव
शिराढोण येथील ख्वॉजा नसिरोद्दीन मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी विशेष प्रयत्न होत असतात. यामध्यो माती कला, टाकावू वस्तूपासून टिकावू वस्तू तयार करणे, पारंपारी सनासाठी प्रदुषण रहित वस्तूंची निर्मीती करणे आदीं हस्तकलांचे प्रयोग शाळेत शिक्षकांकडून शिकवले जातात.
सहाशिक्षक पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेही शैक्षणिक साहित्याचे वाटप
या गणवेश वाटपाच्या कार्यक्रमातच ख्वॉजा नसीरोद्दीन प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षक राजेश्वर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.