प्रतिनिधी / कळंब
तालुक्यातील माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी माँ जिजाऊ साहेब यांची वेशभुषा साकारली होती.तसेच त्यांनी माँ जिजाऊ साहेब यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. सहशिक्षक हनुमंत घाडगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जिजाऊ यांच्या जीवन कार्याबद्दल व केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये जिजाऊ साहेब यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.अध्यक्षीय समारोपात शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोजने म्हणाले, जिजाऊ होत्या म्हणूनच शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करता आले. माँ जिजाऊ यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये शहाजीराजांना शिवरायांकडे पुरेसे लक्ष देता आले नसले तरी त्यांची ही उणीव जिजाऊ साहेबांनी भरून काढली आणि एक चांगला आदर्श, थोर राजा आपल्या देशाला मिळाला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेतील सहशिक्षिका समीना बागवान यांनी केले.