तहसीलदार प्रियमवदा म्हाडदळकर यांचे पारधी समाजातील नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी । शिराढोण
शिक्षणाला प्रथम प्राधान्य देवून आपल्या मुलांना अधिकारी बनविण्यासाठी पारंपारिक विचारसरणी सोडून कायम प्रयत्न करा, असे आवाहन कळंब येथील तहसीलदार प्रियमवदा
म्हाडदळकर यांनी केले. येथील क्रांती नगर पारधी वस्तीवर अनुसूचीत जाती भटक्या विमुक्त जमाती, अंध, पारधी मसनजोगी, गारूडी जातीतील लोकांना सेवा पुरवण्यासाठी आयोजित एक दिवसीय विशेष शिबीरात त्या बोलत होत्या.
उपस्थित पारधी समाजातील नागरिकांना आवाहन करताना त्या म्हणाल्या की, तुम्ही तुमच्या पाल्याच्या शिक्षणसाठी पुढाकार घेवून शिक्षण देण्यासाठी पुढे आलात तर शासन सर्वोतोपरी तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी, दर्जेदार सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहे. केवळ तुमचा पुढाकार त्यासाठी महत्वाचा असून,आपल्या मुलाला अधिकारी बनविण्यासाठी तुम्ही स्वप्न बाळगून त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.शिराढोण येथे क्रांती नगर पारधी वस्तीवरील नागरिकांना जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदान कार्ड संजय गांधी योजना लाभ, आधारकार्ड अपडेशनसाठी कळंब तहसील कार्यालय व पोलीस प्रशासन यांच्या वतीने एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शिबीरासाठी तहसीलदार प्रियमवदा म्हाडदळकर,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, सहाय्यक पोलीस नरीक्षक कल्याण नेहरकर, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर पाटील, शिराढोण मंडळ अधिकारी नरेशकुमार सुतार, तलाठी शरद दुधभते, ग्रामविकास अधिकारी मोतीराम करपे, सामाजिक कार्यकर्ते शहाजीराव पाटील, बजरंग ताटे, नितीन पाटील, आधार ऑपरेटर महेश पानढवळे, शिराढोण ग्रामपंचायतीचे लिपीक मुन्ना यादव यांच्यासह सेवा देण्यासाठी तहसील कार्यालयातील संबंधित सेवेसाठी विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार यांच्या हस्ते येथील लाभधारकांना जात प्रमाणपत्रांचे तसेच इतर सेवांचे तत्काळ वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिराढोण जिल्हा परिषद प्रशालेतील सहशिक्षक संघशील रोडे यांनी केले.