प्रतिनिधी / मुंबई
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पुन्हा एकदा बंड केलं आहे. साडेतीन वर्षांपूर्वी पहाटे शपथविधी उरकणाऱ्या अजित पवारांनी यावेळी दुपारी शपथविधी उरकला. त्यांच्यासोबत राष्टवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आपल्यासोबत ३० आमदार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यातील चार आमदारांनी अचानक तटस्थ भूमिका घेतली आहे. शरद पवारांनी आक्रमक पवित्रा घेताच ९-१० आमदारांनी पवित्रा बदलला असून,त्यामुळे यावेळीही अजित पवार यांचा डाव पलटतोय की काय असे तर्क काढले जात आहेत.
पारनेरचे आमदार निलेश लंके, चिपळूणचे आमदार शेखर निकम, शिरुरचे अशोक पवार, वसमतचे राजू नवघरे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, अकोलेचे आमदार किरण लहामटे, पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. कालपर्यंत अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांची भाषा अचानक बदलली आहे. आपण अजित पवारांसोबत नाही, शरद पवारांसोबत आहोत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतलेली नाही. मात्र कालपर्यंत अजित पवारांसोबत असलेले आमदार आता तटस्थ भूमिकेत आहेत. तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल झाले आहेत. गेल्या २ वर्षांत नॉट रिचेबल होण्याची ही त्यांची चौथी वेळ आहे. शहापूरचे आमदार दौलत दरोडा काल अजित पवारांसोबत उपस्थित होते. मात्र आज त्यांनी थेट शरद पवारांच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे.
अजित पवारांसह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. आता थांबणे नाही. महाराष्ट्र पिंजून काढणार, जनतेत जाणार आणि पक्ष पुन्हा उभा करणार, असा निर्धार शरद पवारांनी बोलून दाखवला. यावेळी शरद पवारांची देहबोली कमालीची आश्वासक वाटत होती. शरद पवारांची आक्रमक भूमिका पाहता कालपर्यंत अजित पवारांसोबत असलेल्या ९ ते १० आमदारांनी आता तटस्थ भूमिका घेतली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या आमदारांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजित पवारांसोबत शपथ घेणाऱ्या ९ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी राष्ट्रवादीनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. मंत्री झालेले ९ आमदार वगळता अजित पवारांसोबत गेलेल्या इतर आमदारांच्या परतीचे प्रयत्न सुरू आहेत.