राजशिष्टाचाराचा भंग करणार्यांवर कारवाईची शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांची मागणी
प्रतिनिधी / धाराशिव
देशातील सुमारे 52 रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण करण्यात येत असून, या स्थानकांच्या उद्घाटनाचा सोहळा ऑनलाइन पध्दतीने रविवारी सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. धाराशिव रेल्वे स्थानकाचेही उद्घाटन पार पडले, मात्र या सोहळ्यात मानापमान नाराजी आणि टोलेबाजी पहायला मिळाली. या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना डावलण्यात आले, तर स्थानकावरील कोनशीलेवर त्यांच्या नावाचा उल्लेखही करण्यात आला नाही. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी नाराजी व्यक्त करत कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या प्रशासनावर टीका केली. तर उपस्थित लोकप्रतिनिधींमध्ये कार्यक्रमातच कलगीतुरा रंगला.
कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना कार्यक्रमाला आमंत्रित करणे आवश्यक असताना भूम-परांडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ.तानाजी सावंत यांना आमंत्रित केले गेले नाही. शिवाय त्यांच्या नावाचा उल्लेख देखील कोनशीलेवर केला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबद्दल बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज साळुंके म्हणाले, रेल्वे स्थानक नूतनीकरण समारंभात राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांना डावलल्याच्या घटनेने शिवसैनिकांमधून तीव्र संतापाची लाट आहे. रेल्वे स्थानक नूतनीकरणाच्या कोनशिलेवर पालकमंत्र्यांच्या नावाचाही उल्लेख न केल्यामुळे राजशिष्टाचाराचा भंग करणार्या रेल्वे प्रशासनावर कारवाई करावी. महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्याचे नेतृत्व करणारे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या नेत्याला डावलून हा कार्यक्रम आयोजित करून रेल्वे प्रशासनाकडून दुजाभावाची वागणूक दिली गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.