-युवराज माने,पारडी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ता.सेलू, जि.परभणी
शिकणं कधी थांबत नाही. आजवर कितीतरी संकट आली. त्या प्रत्येक संकटावर मानवाने मात केली आहे. हे सर्व करण्यात माणूस कुठंच थांबला नाही. म्हणजे शिकत राहिला. शिक्षण सतत चालणारी प्रक्रिया आहे. संकटातूनही माणूस खूप काही शिकत असतो. आजवर अनेक रोग आले त्यावरही माणसाने औषधे व लशी शोधून काढल्या. ही एक शिक्षणाची प्रक्रियाच होय. यापुढे जाऊन माणसाने कोरोनावरची लस किती कमी कालावधीत तयार केली हाही कौतुकाचा विषय आहे. यापूर्वी लस तयार करण्यास कितीतरी वर्षे लागायची. पण तंत्रज्ञान विकसित करून माणूस खूप पुढचा विचार करत आहे. विचार करणे हा ही शिक्षणाचाच एक भाग आहे.
कोरोनाचं संकट आलं आणि काही काळ जग थांबल्यासारखंच झालं. पण काही गोष्टी सुरू होत्या. अनेक जणांची जीवन जगण्याची धडपड सुरू होती. आलेल्या संकटावर कशी मात करायची याचं जिवंत शिक्षण माणूस घेत होता. म्हणजेच शिक्षण सुरूच होतं. फक्त शाळेतच शिक्षण होतं, किंबहुना दिले जाते ही आपल्या सर्वांची धारणा आहे किंवा होती ती कोरानाच्या संकटाने आता बदलली आहे असे म्हणावे लागेल.
शाळा बंद होत्या तरी लेकरांच शिकणं सुरू होतं हे मी ठामपणे सांगतो. कारण पहिल्यांदाच कुटुंबातले सर्व सदस्य एकत्र आले होते. ही मोठी संधी लेकरांना होती. सर्व सदस्यांनी एकत्र येऊन राहण्याचे प्रसंग यापूर्वी आले पण एक दोन दिवसासाठीचे पण कोरोनात अनेक महिने सोबत रहायला मिळाले. यात लेकरांना कुटुंबातील सर्व नातेवाईक जवळून अनुभवता आले. आजी-आजोबा यांचं कुटुंबातील स्थान, त्यांचे अनुभव, बालपणातील अनेक गोष्टी लेकरांना ऐकायला मिळाल्या. आई स्वयंपाक कशी करते, त्यात लेकरांना सहभागी होता आलं, घरातील कामे करताना आई किती थकते हेही लेकरांना अनुभवता आलं. आपले वडील व त्यांचे भाऊ एकमेकांचा कसा आदर ठेवतात, त्यांचे स्वभाव अनुभवले.
शाळेच्या बाहेरचं जग विशेषतः कुटुंबाची सर्व अंगं लेकरांना जवळून अनुभवता आली. जुने बैठे खेळ, शाब्दिक खेळ, जुनी गाणी, गोष्टी, चित्रं, रांगोळी, भेंड्या, भाषा अशा कितीतरी अनुभूती लेकरांनी अनुभवल्या म्हणजेच लेकरांचं शिक्षण सुरू होतं हे नक्की आहे. आता राहिला प्रश्न शाळेतील नियोजित वेळेतला अभ्यास. पाठ्यपुस्तकं एक मार्ग आहे; ज्या मार्गाने गेल्यास शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण होते. याबाबत मात्र शहरातील मुलांना काही ना काही करता आले. शहरातील शाळांना ऑनलाईन पद्धतीने शिकवता आले. ही एक प्रकारची मोठी उपलब्धीच म्हणावी लागेल. अनेक शिक्षकांनी शिकवण्याच्या अनेक पद्धती शोधून काढल्या. लेकरांना ऑनलाईन पद्धतीने शिकण्यात एक वेगळाच आनंद मिळू लागला पण तो काही काळच म्हणावा लागेल. नव्या गोष्टीतलं कुतूहल संपलं की लेकरं कंटाळतात. याशिवाय याला लागणारा पैसा व मुलांच्या डोळ्यांची होणारी हानी ही वेगळीच बाब आणि सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे लेकरांच्या हाती दिलेलं मोबाईल हे साधन! याचा योग्य वापर झाला तर उत्तमचं पण यातून लेकरं दुसर्याच गोष्टींकडे वळले तर शिक्षणापेक्षा हानीच जास्त ……
ऑनलाईन शिक्षण कमी-अधिक प्रमाणात खेड्यातील लेकरांनाही मिळालं. पण सर्व लेकरं यात सहभागी नव्हती. मोबाईल सर्वांना मिळू शकले नाहीत. म्हणून ते या प्रवाहात आले नाहीत. पण ग्रामीण भागात अनेक शिक्षकांनी वेगवेगळे गृहपाठ तयार करून लेकरांना वाटण्यात आले. त्यानुसार लेकरं अभ्यास करू लागले. ग्रामीण भागातील लेकरांना शेतीतील अनेक नवीन कामं, प्राण्यांच्या गमती -जमती, आई-वडील यांचे शेतातील कामे, कष्ट अशा अनेक कामात सहभाग घेता आला. यातूनही लेकरं शिकतच होती.
साधारणपणे दोन वर्षे या घडामोडीत शाळा लेकरांची वाट पाहत होती. जेव्हा हे लेकरं शाळेत आले तेव्हा त्यांच्या इयत्ता दोन वर्षांनी पुढे गेलेल्या होत्या. पहिलीत प्रवेशित मुलं आता सरळ सरळ तिसरीत पोचली होती. आता या लेकरांना अक्षर ओळख ना अंक ओळख! हे मोठं आव्हान आमच्या समोर होतं. इतरही वर्गाचं असंच काहीसं झालं होतं. दोन वर्षे विस्कळीत झालेले शालेय शिक्षण पूर्ववत होण्यासाठी आम्हा सर्व शिक्षकांचा खरा कस लागला म्हणावा लागेल. ह्या झाल्या अभ्यासातील अडचणी पण मुलांच्यात काही बदल पाहण्यास मिळत होते. त्यात काही उत्तम तर बरेच आळशीपणाचे. ज्या लेकरांना कोरोनापूर्व काळात ठरवून दिलेल्या शैक्षणिक क्षमता प्राप्त झालेल्या होत्या त्यांना किती वाचू अन् कधी शाळेत जाऊ असे झालेलं लक्षात आले. लेकरं शाळेत येण्यास आसुसलेली होती. तर ज्यांना या क्षमता प्राप्त नव्हत्या त्या लेकरांना शाळा, पुस्तकं, लेखन, वाचन अशा गोष्टी जड वाटू लागल्या. ते कंटाळा करताना दिसू लागले. हे मोठं आव्हान आमच्यासमोर होतं.
लेखन ही चौथ्या क्रमांकावर येणारी क्षमता ती पहिलीत सुरू न होता तिसरीत सुरू झाली पण काही वेगवेगळ्या युक्ती शोधून त्या वापरून लेकरांना त्या क्षमतेवर वर्ष अखेर आणण्याचा प्रयत्न सुरूच आहे. याशिवाय पुढील वर्गातील लेकरांच्याही वेगवेगळ्या अडचणी समजून घेऊन त्यांनाही त्यांच्या वर्ग क्षमतेवर आणता आले. यासाठी शाळेत आनंददायी शिक्षण प्रयोग राबवावे लागले. त्यामुळे लेकरांना शाळेत रमवून ठेवता आलं. आमच्या शाळेच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमची ‘आनंदाचं झाड’ ही संकल्पनाच यासाठीच जन्मास आलेली आहे. मुलांना त्यांच्या मनासारखं शाळेत मिळायलाच हवं तरच त्यांच्या शाळेत येण्यास अर्थ आहे. मुलांना स्वतः होऊन शाळेत यावंसं वाटेल असं शाळेत नवनिर्माण करावं लागेल ते आम्ही ‘आनंदाचं झाड’ या संकल्पनेत तयार केलं आहे. म्हणूनच आम्हाला कोरोनातील मागे राहून गेलेले शिक्षणातील घटक लवकरच पूर्ववत करता आले.
आनंदाचं झाड हे एक स्वप्न आहे; जिथे मुलांना स्वतःहुन यावंसं वाटेल, शिकावं वाटेल, इतरांना आनंद द्यावासा वाटेल. शाळेत येणारं प्रत्येक मूल दररोज काही ना काही घेऊन जाईल, आपल्या अनुभवांच्या शिदोरीत जमा करत जाईल. पाठ्यपुस्तकांच्या बाहेर जाऊन प्रत्येक मूल विचार करू लागेल. त्यांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सर्वजण मिळून शोधतील जिथे केवळ आणि केवळ आनंद असेल. चुकण्यास शिक्षा नसेल, शिक्षा असेल ती शिकण्याची, प्रेमाची! शाळेतला प्रत्येक गुरुजी मुलांचा मित्र असेल. आपल्या गुरुजींसोबत बोलतांना त्यांना कुठल्याही प्रकारचा किंतू परंतु येणार नाही. मुलांच्या हातून घडलेल्या चुकांचा न्याय – निवाडा करण्यासाठी मुलांचे स्वतंत्र न्यायमंडळ असेल.
शाळेतला एखादा विद्यार्थी आजारी असेल, तर प्रत्येकजण जाऊन त्याला भेटेल,जिथे आजी – आजोबा स्वतः हून शाळेतील मुलांसोबत गप्पा मारतील.प्रत्येक मित्र आरसा असेल. प्रत्येक मूल कोणत्याही विषयावर व्यक्त होऊ शकेल असं वातावरण असेल.कुटुंबापासून जगापर्यंतचा प्रवास इथचं उलघडला जाईल आणि सदैव मुक्त शिक्षणाला वाव असेल. मनुष्याने निर्माण केलेल्या देव देवतांची खरी कहाणी लेकरांना ऐकायला मिळेल. एकमेकासंगे राहून , सर्वांना सोबत घेवून जाऊ अशी धारणा इथे मुलांची होईल. मुलांच्या निर्मितीच आकाश सदैव खुले असेल. मुलांच्या नात्यातील सुंदर धागे विणले जातील.
चला,पहा, करा, भेटा, वाचा,शोधा,बोला पद्धती शिक्षणात असेल. शिवार भ्रमंतीत मुलं अनेक गोष्टी संपादित करतील. वर्षातून एकदा तरी रात्रीची शाळा भरेल अन् नकला नाट्यतून फुलतील अनेक कलाकार आणि मुलांना बालपण म्हणजे आयुष्यातील पहिला पाऊस असतो आणि या पावसात सर्वांनी भिजायचं असतं आणि पावसाचा आनंद लुटायचा असतो हे ही इथचं जाणवेल. अशा एका सुंदर संकल्पनेचे हे स्वप्न साकारताना लेकरांच्या चिमुकल्या छोट्या छोट्या डोळ्यात उद्याची नवीन स्वप्न साकार करण्याचे बळ देता येईल. हे सर्व मुक्तपणे राबवले म्हणून आमची लेकरं कोरोनानंतर लगेच शिक्षणाच्या प्रवाहात आली.