Pune Girl Attack: पुण्यात काल सकाळी एका तरुणीवर कोयत्यानं हल्ला केल्याची थरारक घटना घडली होती. पण यामध्ये जीवावर उदार होत दोन MPSC करणाऱ्या तरुणांनी संबंधित तरुणीला वाचवलं होतं. त्यांच्या या धाडसाला सलाम करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही तरुणांना बक्षीस जाहीर केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. आव्हाड म्हणतात, “पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला. या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी 51,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचं मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल”
पुण्यात मध्यवर्ती भागात मंगळवारी दिवसाढवळ्या थरार पहायला मिळाला. एका तरुणानं एकतर्फी प्रेमातून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर कोयत्यानं वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी जीव घेऊन रस्त्यावरुन पळत होती.
मारेकरी तरुण तिच्याजवळ येऊन डोक्यात वार करणारच तेवढ्यात या तरुणाचा हात लेशपाल जवळगे या तरुणानं पकडून ठेवला त्यामुळं मुलीवर वार होताहोता वाचला आणि ती बचावली. त्यानंतर लेशपाल याच्या मदतीला हर्षदही धावला आणि त्या दोघांनी आरोपी तरुणाला पकडून ठेवलं आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.
दरम्यान, या दोघांच्या मदतीला इतरही लोक धावले आणि त्यांनी आरोपी तरुणाला चांगलाच चोपही दिला. पण MPSC करणाऱ्या या तरुणांनी प्रसंगावधान राखून तरुणीची मदत केल्यानं तिचा जीव तर वाचलाच पण या कृतीमुळं या तरुणांचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे. अशाच प्रकारे धाडस दाखवल्यास कुठल्याही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून असे जीवघेणे हल्ले करण्याची हिंमत होणार नाही.