प्रतिनिधी / तामलवाडी
भारत देशाला स्वतंत्र मिळून 76 वर्षे पुर्ण झाली. मात्र, अद्यापही तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी हे गाव महसूली पारतंत्र्यात होते. गेल्या पाच दशकापासून येथील ग्रामस्थांची स्वतंत्र महसूल सज्जाची मागणी होती. अखेर ग्रामस्थांच्या मागणीस मोठे यश आले असून, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी 5 सप्टेंबर रोजी पांगरदरवाडी गावाचे महसूली क्षेत्र सांगवी (काटी) गावातून विभक्त करुन पांगरदरवाडी गावच्या नावाने स्वतंत्र अभिलेख करण्याचे आदेश तुळजापूर येथील तहसीलदारांना दिले आहेत. हा आदेश निघताच गावातील नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
या गावची लोकसंख्या तीन हजारावर असून, गावास स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय आहे. मात्र, हे गाव ऑनलाईनला दाखवत नसल्यामुळे या ग्रामपंचायतला निधी मिळणे मुश्किल झाले होते. औरंगाबाद विभागाचे तात्कालिन आयुक्त बी.के.चौगुले यांनी 1 एप्रिल 1973 रोजी पांगरदरवाडी गावास स्वतंत्र महसूल दर्जाची घोषणा करुन अधिसुचना जारी केली होती. परंतु संबंधित विभातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या गावातील नागरिकांना आतापर्यंत महसुली सज्जापासून वंचित रहावे लागले. गावकऱ्यांच्या मागणीस अखेर यश मिळाले. सज्जासाठी प्रधान्याने गावातील उपसरपंच सोमनाथ शिंदे, पत्रकार गणेश गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी प्रशासनातील जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार प्रविण पांडे, शरद मोटे, हनुमंत क्षीरसागर, ग्रामसेवक एल. के. सुरवसे यांनी सहकार्य केले. त्याबद्दल गावाकऱ्यांनी त्यांचे आभार मानले. सज्जा विभक्त केल्याबद्दल गावात आतिषबाजी करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गावकऱ्यांनी ग्रामपंचायतचे पदाधिकारी सरपंच सिंधू पोपळे, उपसरपंच सोमनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्या किरण गायकवाड, अमृपाली डोंगरे, सावित्रा शिंदे, लक्ष्मण क्षीरसागर, बापू साळुंके, सोनाली सावंत, तुळसाबाई शेळके, आलीफ सय्यद यांचा गावकऱ्यांनी नागरी सत्कार केला. यावेळी प्रताप निंबाळकर, मोहन क्षीरसागर, महेश सावंत, अमोल मारडकर, प्रमोद कदम, धनाजी शेळके, दिपक शिंदे, नागनाथ शेळके, आण्णासाहेब जाधव, आबाराव शिंदे, माजी सरपंच बालाजी शिंदे, नागनाथ मारडकर, राजाराम जाधव आदी गावकरी यावेळी उपस्थित होते.
आता दरवर्षी 5 सप्टेंबरला घरांवर झेंडा
गेल्या अनेक दिवसांपासून आमची स्वतंत्र महसुल दर्जाची मागणी होती. खऱ्या अर्थाने आमच्या गावाला आज स्वातंत्र्य मिळाले. या दिवसाची गावच्या इतिहास नोंद झाली आहे. त्यामुळे इथून पुढे आम्ही पाच सप्टेंबरला गावातील प्रत्येक घरावर झेंडा लावण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
–गणेश गायकवाड, ग्रामस्थ, पांगरदरवाडी