विशेष प्रतिनिधी / मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एकदा मोठी घडामोड घडली असून,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे पक्षातून 30 आमदारांचा गट घेऊन भाजपच्या गटात सामील होत आहेत. आज सांयकाळी अजितदादा यांच्यासह पक्षाचे काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या या भूमिकेला पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा आहे का याबद्दलचा खुलासा अजून झालेला नाही.
साडेतीन वर्षांपूर्वी महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून धुसफूस सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी अचानकपणे पहाटेचा शपथविधी केला होता. त्यानंतर शरद पवारांनी आपला याला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर काही तासांतच हे सरकार कोसळले आणि पुन्हा नव्या म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकीय नांदीला सुरुवात झाली. अडीच वर्षे झाल्यानंतर मात्र हे सरकार टिकू शकले नाही. शिवसेनेत मोठी फूट पडली आणि भाजपच्या सोबतीला जाऊन सेनेच्या शिंदे गटाने सरकार स्थापन केले. आता हे सरकार येऊन वर्ष लोटले नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने भाजपची जवळीक केली आहे.त्यामुळे आता पुढे काय होते,याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
आजच शपथविधी..
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. आज सायंकाळी शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या फुटीनंतर मात्र शरद पवार यांची भूमिका समोर आलेली नाही.