शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांची आमदार कैलास पाटील यांच्यावर टीका
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदलेले रस्ते दुरुस्त न केल्यामुळे 3 वर्षापासून नागरिक हैराण आहेत. शहरात जागोजागी कचरा साचला आहे. पाणीपुरवठ्याची ओरड कायम आहे. धाराशिव शहरातील जनता हे मुकाटपणे सहन करत असताना आमदार कैलास पाटील पाच वर्षे गप्प बसले आणि आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जणू शहरातील जनतेचा कळवळा असल्याचे ते भासवत आहेत. त्यांनी 3 दिवसापूर्वी शहरातील प्रश्नांवर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. पण जनतेला आजवर झालेल्या त्रासाचे काय,तुम्ही प्रभावी असल्याचा प्रचार करत आहात,तुम्ही प्रभावी नव्हे तर निष्क्रीय ठरला आहात, अशी टीका शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी आमदार कैलास पाटील यांच्यावर केली आहे.
सुधीर पाटील यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन आमदार कैलास पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.ते म्हणाले, आमदार कैलास पाटील यांनी डिजिटल लावून भावी अनेक, प्रभावी एक,असा प्रचार सुरू केला आहे. वास्तविक पाहता त्यांना 5 वर्षात कामातून प्रभाव निर्माण करता आला नाही,त्यामुळे त्यांना अशी जाहिरात करावी लागत आहे. त्यांना आमदार म्हणून कोणत्या जबाबदाऱ्या असतात,याचेच ज्ञान नाही. त्यांना कामाचा अनुभव नाही. मतदारसंघातील कोणत्या प्रश्नाचा पाठपुरावा केला गेला पाहिजे,याचा त्यांनी आधी अभ्यास करायला हवा होता. त्यांनी याबाबत प्रशिक्षण घ्यायला हवे होते. मंत्रालयात पाठपुरावा करायला हवा होता. त्यासाठी सहकारी नियुक्त करायला हवे होते. त्यामुळेच त्यांना पाच वर्षात मतदारसंघात एकही काम करता आले नाही. त्यांनी या काळात एकतरी प्रभावी काम केले आहे का,हे जनतेला सांगावे.
जनता प्रश्न विचारणार ?
मतदारसंघात धाराशिव आणि कळंब अशा दोन नगर पालिका आहेत.या पालिकेच्या माध्यमातून विकास कामे अपेक्षित असताना विकास नाही तर शहरे बकाल करून टाकली आहेत.धाराशिव नगर पालिकेच्या विकासासाठी त्यांनी काय योगदान दिले,हे आता जनता विचारणार म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली आणि शहराच्या प्रश्नांवर जणू आपण कटिबध्द आहोत,हे दाखविण्याचा प्रयत्न केला. अशाच पद्धतीने पाच वर्षांत कामे केली असती तर जनतेला त्रास झाला असता का, भुयारी गटार योजनेच्या कामाचा त्यांनी पाठपुरावा केला आहे का, या योजनेच्या खोदकामानंतर दुरुस्तीसाठी 18 कोटींच्या निधीची तरतूद निविदेत करण्यात आली होती.त्याचा पाठपुरावा केला असता तर रस्त्यांची दुरवस्था दिसली नसती,असे सुधीर पाटील म्हणाले.
आमदार प्रभावी नव्हे, निष्क्रीय
सुधीर पाटील म्हणाले,आमदार कैलास पाटील यांनी प्रभावी आमदार असा प्रचार सुरू केला आहे पण प्रभावी कशाला म्हणायचं,याचा अर्थ आमदारांना समजला की नाही, असा प्रश्न पडला आहे. आमदारांनी माहिती करून घ्यायला हवी होती, एक तरी काम दाखवा,
नगर पालिकेच्या एकतरी काम दाखवा,
एकही रस्ता नीट नाही आणि यात प्रभाव कसला.ते प्रभावी नव्हे तर निष्क्रीय आमदार ठरले आहेत.