प्रतिनिधी / वाशी
मनोज जरांगे पाटील यांच्या बुधवारी (दि.१५) भूम तालुक्यातील ईट येथे झालेल्या सभेच्या आयोजकांवर वाशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभा झाल्यापासून चार दिवसानंतर सदरील गुन्हा नोंद करण्यात आला. त्यामुळे वाशीसह भूम तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवानी मंगळवारी (दि. २१) वाशी पोलिस स्टेशनला भेट दिली. यावेळी राजकीय दबावाखाली मराठा समाज बांधवांवर गुन्हे दाखल करू नयेत अशी मागणी पोलिस निरीक्षक शशी दसुरकर यांच्याकडे चर्चे दरम्यान करण्यात आली.
वाशी येथील सभेला दीड लाख लोक उपस्थित होते.तरीही पोलिस यंत्रणेवर कुठलाही ताण सकल मराठा समाजाने येऊ दिला नाही. मराठा आरक्षण लढ्याच्या सर्व आंदोलनात सकल मराठा समाजाने पोलिस यंत्रणेला नेहमी सहकार्य केले असल्याचे यावेळी उपस्थित बांधवांनी सांगितले. सभा उशिरापर्यंत चालली म्हणुन करण्यात आलेली कारवाई गैर आहे असे बांधवांनी सांगितले. अशा पद्धतीने गुन्हे नोंद केल्याने चुकीचा संदेश राज्यभर जाऊन तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मराठा समाजाला विश्वासात घेऊन कारवाई करण्याची विनंती पोलिसांना करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक शशी दसुरकर यांनी उपस्थित सर्व मराठा समाज बांधवांशी कायदेशीर बाबींविषयी चर्चा केली.