प्रतिनिधी / धाराशिव
मराठा आरक्षणासाठी आता गावागावात लोकप्रतिनिधींना रोखले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षण जाहीर करण्याच्या मागणीसाठी राज्यातील प्रत्येक सर्कलमध्ये साखळी आंदोलन करण्यात येत आहे.तसेच लोकप्रिनिधींनीही गावात प्रवेश बंद करण्यात आले आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गावात गोवर्धनवाडी (ता. धाराशिव) येथेही आता नेत्यांना गावबंदी करण्यात आली असून, गावाच्या वेशीवर डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे आंदोलनाची झळ आता सगळ्याच लोकप्रतिनिधींना बसण्याची शक्यता आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मूळ गावात म्हणजे गोवर्धनवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला. लगेच शनिवारी सकाळी गावाच्या वेशीवर आणि बसस्थानकावर पक्ष गेला चुलीत,असे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे खासदारांना त्यांच्याच गावात जाण्याची पंचाईत झाली आहे. दरम्यान पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत हे तुळजापूर येथील महाआरोग्य शिबिरासाठी येणार होते,मात्र त्यांचा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे.
ओमराजेंचे निवसास्थान गावातच
खासदार ओमराजे निंबाळकर यांचे निवासस्थान गोवर्धनवाडी येथे असून, ते गावालगत असलेल्या त्यांच्या शेत्तातील घरी वास्तव्याला असतात. त्यामुळे त्यांना गावात प्रवेश दिला जाणार नसला तरी ते मुख्य रस्त्याने त्यांच्या घरी जाऊ शकतात.मात्र आंदोलनाच्या बदलत्या परिस्थितीत येणाऱ्या काळात नेत्यांची गोची होणार,त्यातून संघर्ष वाढणार हे निश्चित आहे.