पत्रानंतर मनोज जरांगे – पाटील काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष
आरंभ मराठी / मुंबई
मराठा आरक्षणासाठी कायम पुढाकार घेणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी आता चौथ्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून, सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे जरांगे पाटील उपोषण सोडायला तयार नाहीत. त्यांची प्रकृती तासातासाला गंभीर होत आहे. या पार्श्भूमीवर त्यांनी उपोषण सोडावं, या मागणीसाठी संघटनेने त्यांना पत्र पाठवले असून, त्यात छत्रपती शिवरायांची शपथ घालण्यात आली आहे. या पत्रानंतर तरी पाटील उपोषण सोडणार का याकडे लक्ष लागले आहे.
सगे सोयऱ्यांसदर्भातील निर्णय तातडीने घ्यावा,यासाठी मनोज पाटील यांनी 10 तारखेपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांची प्रकृती ढासळत आहे. सरकार मात्र भूमिका जाहीर करायला तयार नाही. त्यामुळे आपण उपोषण सोडणार नाही, असा त्यांनी ठाम निर्धार केला आहे. या पार्श्भूमीवर महाराष्ट्रातील सर्व मराठा डॉक्टरांच्या मराठा मेडीकोज महाराष्ट्र राज्य या संघटनेने त्यांना पत्राद्वारे आवाहन केले आहे.त्यात म्हटले आहे की, आपल्याला छ्त्रपती शिवाजी महाराज यांची शपथ आहे, उपोषण मागे घ्या.
काय म्हटले आहे पत्रात..?
प्रति,
मराठा योध्दा श्री. मनोजदादा जरांगे-पाटील अंतरवली सराटी,
मा. मनोजदादा
आम्ही महाराष्ट्रातील सर्व मराठा डॉक्टर सर्व प्रथम अशी ग्वाही देतो की, आम्ही सर्वच नाही तर संपूर्ण समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपण केलेल्या आंदोलनामुळे मराठयांच्या पदरात खूप काही गोष्टी पडल्या आहेत व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व समाज कधी नव्हे तो आपल्या नेतृत्वाखाली एकवटला आहे.
आपण प्रत्येकवेळी सांगत होता की, आता तब्येत साथ देत नाही, तरीही आपण उपोषण करण्याचा निर्णय घेतला, समाज म्हणून आम्ही त्यावेळीही सोबत होतो व आताही आहोत पण आता आपली तब्येत अतिशय खालावली आहे व कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते,
म्हणून आम्ही आपणांस मराठा मेडीकोज, महाराष्ट्र राज्य विनंती करतो की आपण हे उपोषण त्वरीत स्थगित करावे व उपचार घ्यावेत.
सरकार सोबतची लढाई सुरुच राहील पण आपणांस काही झालं तर समाजाला कोणीच वाली उरणार नाही व समाजाचे प्रचंड मोठ नुकसान होईल व आपण प्रत्येकवेळी म्हणता की सर्व निर्णय समाजाला विचारुन घेता मग आता समाजाचाही एक निर्णय आपण ऐकला पाहीजे व उपोषण त्वरीत स्थगित केले पाहिजे.
आपणांस छत्रपती शिवरायांची शपथ आहे, आपण हे उपोषण त्वरीत स्थगित करावे व उपचार घ्यावेत. आपण हा लढा जिंकेपर्यंत असाच सुरु ठेवू पण तुर्तास थोडं थांबू कारण आपण समाजाला हवे आहात.
जर आपणच राहिला नाहीत तर पुढे लढायला कोणच नसेल, परत दलालांचे फावेल व समाजाच्या नांवावर दुकानदारी सुरु होईल. परत एकदा कळकळीची विनंती आपण उपोषण त्वरीत स्थगित करावे व उपचार घ्यावेत.
एकच मिशन मराठा आरक्षण
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान
धन्यवाद ..
–