प्रतिनिधी / पुणे
आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात जाती-जातीत भांडणे लावून दिली गेली आहेत. एरवी एकत्र कामधंदा करणारे, मिळून मिसळून राहणारे लोक आरक्षणाच्या प्रश्नावर एकमेकाच्या समाजाबद्दल द्वेषाची भाषा वापरत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात सामाजिक सलोखा परिषद पार पडली. यावेळी महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले तसेच बंधुत्वाची भावना जोपासली जावी, असा सूर उमटला
राज्यात अलीकडे आपापली बाजू आग्रहाने मांडण्याच्या नादात सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. नेत्यांचे कलगीतुरे माध्यमे चवीने दाखवत आहेत. समाजाचे व्हॉट्सअप ग्रुप अशा द्वेष मोहिमेचे अड्डे बनलेले आहेत. या मुद्द्यावर सर्व संवेदनशील नागरिक अस्वस्थ असताना पिंपरी चिंचवड शहराने मात्र पुढाकार घेऊन इतिहास घडवला. २४ डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या सामाजिक सलोखा आरक्षण परिषदेत सर्व समाज घटकांच्या प्रतिनिधींनी आपापली आरक्षणाची बाजू स्पष्टपणे व जोरकसपणे मांडली. पण ती मांडताना इतर समाजाबद्दल द्वेष वा तिरस्कार न पसरवण्याचा निर्धार व्यक्त केला. आपण सर्वजण भारतीय आहोत आणि आपण बंधुत्वाची भावना राखली तरच आपल्या सर्वांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे ही भावना सर्वांनी मांडली.
संविधानातील सोळाव्या कलमानुसार ज्या समाज घटकांना पर्याप्त प्रतिनिधीत्व नाही अशा समाज घटकांना ते मिळाले पाहिजे. तसेच पर्याप्त प्रतिनिधीत्व नसल्याबाबतचे सर्वांचे दावे प्रतिदावे तपासण्यासाठी तातडीने जातनिहाय जनगणना झाली पाहिजे,असा ठराव परिषदेने एकमताने मंजूर केला. तसेच संविधानातील एक्केचाळीसाव्या कलमाने सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार ही जबाबदारी राज्य व्यवस्थेवर टाकली आहे. सर्व जाती-धर्मातील तरुणाईने एक्केचाळीसाव्या कलमानुसार बेरोजगारी विरोधातील सनदशीर लढा उभा केला पाहिजे, हे आवाहन करण्यात आले.
या परिषदेच्या संयोजनात पुढाकार घेतलेले मानव कांबळे परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते.तर संविधान अभ्यासक सुभाष वारे परिषदेचे उद्धाटक होते.परिषदेत प्रवीण गायकवाड,अंजुम इनामदार,विष्णू शेळके,अजित चौगुले,राजेंद्र कोंढरे, ॲड.मंगेश ससाणे,प्रा.धनंजय भिसे,सतीश कसबे,डॉ शिवानंद भानुसे यांनी आपापली भूमिका मांडली. मारुती भापकर यांनी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे याबाबतचा ठराव मांडला.परिषदेच्या आयोजनात प्रकाश जाधव,सतीश काळे,मारुती भापकर,वैभव जाधव,आनंदा कुदळे,प्रवीण कदम,रवींद्र चव्हाण,दिलीप गावडे,संपत पाचुंदकर,मोहन जगताप,सुनिता शिंदे,मीरा कदम,गिरीश वाघमारे,किरण खोत,पांडुरंग प्रचंडराव यांनी पुढाकार घेतला.