प्रतिनिधी / कारी
मंदिराच्या भोंग्यावरून सतत कानावर पडणारी खंडोबाची भक्तिगीते, मंदिराच्या शिखरपासून गावाच्या वेशीपर्यंत आणि गावातील प्रत्येक प्रमुख रस्त्यांवर करण्यात आलेली विद्युत रोषणाई, खेळण्यांच्या,खाद्यपदार्थांच्या दुकानांनी गजबजलेले रस्ते आणि सगळीकडे उत्साहाचे वातावरण. हे चित्र आहे धाराशिव तालुक्यातील कारी गावातले. कारीचे ग्रामदैवत असलेल्या श्री.खंडोबाची यात्रा सुरू झाली असून, यानिमित्ताने सगळीकडे उत्साहाचे तोरण लागले आहे.
कारी येथे खंडोबा यात्रेनिमित्त मार्गशीर्ष महिन्यात दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापना करून यात्रेला प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी गावात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, सायंकाळी हिंदवी पाटील हीचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यात्रेनिमित्त शनिवारपासून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सायंकाळी सात गावच्या सात अप्सरा हा कार्यक्रम पार पडला तर रविवारी सायंकाळी झालेल्या शिवकन्या बड़े नगरकर यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. इकडे मंदिरात नगपुजन नागदिवे व देवाचा लग्न सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. या कार्यक्रमात ढोलकी, झांजेच्या तालावर आणि भाविकांच्या अभूतपूर्व उत्साहात वारू नाचविण्यात आले. कडाक्याच्या थंडीतही भाविकांचा प्रचंड उत्साह दिसून येत होता. या कार्यक्रमात महिला,लहान मुलांचाही मोठा समावेश होता. मंदिर परिसरात तसेच गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. नोकरी,व्यवसायासाठी गावाबाहेर गेलेले परिवार यात्रेसाठी गावात आले आहेत.
आज रक्तदान,उद्या सुपुत्रांचा सन्मान
श्री.खंडोबा यात्रेनिमित्त सोमवारी सकाळी गावात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.सायंकाळी हिंदवी पाटील ऑर्केस्ट्रा होईल.इकडे देवाला भक्तिमय वातारणात चंपाषष्टी भरीत रोडगा (मानाचा नैवेद्य ) कार्यक्रम होणार आहे.मंगळवारी सकाळी कारी गावातील कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करण्यात येणार आहे.त्यानंतर सायंकाळी देवाचा नंगर तोडण्याचा कार्यक्रम, हभप नीलेश महाराज कोरडे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. रात्री देवाची छबिना मिरवणूक निघणार आहे.
दरम्यान, यात्रा कमिटीच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून, भाविकांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. चोख नियोजनाबद्दल यात्रा कमिटीचे कौतुक होत आहे.
निराधारांना मायेची ऊब, गरिबांना ब्लँकेट वाटप
यात्रेच्या पार्श्वभूमीवर कारी गावातील गरीब कुटुंबांना ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम घेण्यात आला. धाराशिव येथील आपली माणसं सामाजिक संस्था तसेच भारतीय मराठा महासंघाच्या वतीने हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी घेण्यात आला. यावेळी गावातील गोरगरीब कुटुंबांना ब्लॅंकेट वाटप करून मायेची ऊब देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या सात वर्षांपासून संस्थेच्या वतीने दरवर्षी धाराशिव शहरात हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी पुण्यातील माजी नगरसेवक शिवाजीराव पाडूळे, धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, डॉ. तुकाराम विधाते, भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संकेत सूर्यवंशी, आपली माणसं परिवाराचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते खंडू राऊत, अक्षय नाईकवाडी, जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, केदार हिबारे, ऍड. घनश्याम रितापुरे,परीक्षित राजे विधाते, आनंद हाजगुडे, सागर येडवे, नागनाथ थोरात, रणजित विधाते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाबद्दल कार्य गावकऱ्यांनी धाराशिवच्या या तरुणांचे कौतुक केले.