प्रवाशांची गैरसोय थांबवण्याची मागणी
प्रतिनिधी / शिराढोण
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या कळंब आगारातील गलथान कारभारामुळे विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांची होणारी पिळवणूक थांबवावी,अशी मागणी आखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेशसिंह परिहार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय दृष्ट्या सर्वात मोठा आणि चर्चेतील तालुका म्हणून कळंब तालुक्याची ओळख आहे. येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळचे मोठे आगार अस्तित्तवात आहे. सातत्याने नादुरुस्त व जीर्ण झालेल्या बसमधून विद्यार्थी तसेच प्रवासी यांना त्रासदायक प्रवास करावा लागतो. लांब पल्याच्या गाड्याही अर्धवट प्रवासात बंद पडण्याचे प्रमाणही वाढत आहेत. बसच्या सुरळीत असणाऱ्या फेऱ्या अचानकच रद्द केल्या जात असल्याने विद्यार्थी यांची मोठी हेळसांड होते. त्याचबरोबर बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या सर्व समस्याबाबत तात्काळ कारवाई करून प्रवाश्यांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी कळंब व परिसरातील प्रवासी यांच्या वतीने आखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेशसिंह परिहार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन केली आहे.