विकास फक्त कागदोपत्रीच: प्रशासनही लक्ष देईना, वाड्यांची मागणी, आम्हाला पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतीचा दर्जा द्या
आरंभ मराठी विशेष
प्रणिता राठोड / धाराशिव
जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या धाराशिव शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या 3 वाड्या. वाढीव हद्दीत म्हणजे धाराशिव नगर परिषदेत या वाड्या समाविष्ट झाल्या. अर्थातच या वाड्याचा ग्रामपंचायतीचा दर्जा गेला. तेंव्हापासून या वाड्या विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. कारण नगर परिषदेला असलेल्या मूळ भागात विकास करता आला नाही त्यात वाढीव हद्दीत विकास करणं आवाक्यााहेरचे आहे.त्यामुळे या वाड्या आम्हाला ग्रामपंचायतीचा मूळ दर्जा द्या अशी मागणी करत आहेत.त्यासाठी त्यांचा लढा न्यायालयापर्यंत गेला आहे. गावकऱ्यांना शेतातून पाणी आणावे लागते तर शाळांची, रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
राघुचीवाडी,जाधववाडी आणि केकस्थळवाडी या गावातील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. हद्दवाढ होऊन 17 वर्ष उलटून गेली, मात्र गावाच्या विकासावर अजूनही कुणीच गंभीरपणे लक्ष द्यायला तयार नाही.गावांच्या विकासासाठी नगरपालिकेकडे ना पैसा आहे ना वेळ. या सगळ्यामध्ये ग्रामस्थ मात्र भरडले जात आहेत. 17 वर्षापूर्वी गावातील ग्रामपंचायत बरखास्त करून या तिन्ही गावाला धाराशिव नगरपालिकेत समाविष्ट केले गेले. मात्र गावाच्या मूलभूत आणि पायाभूत गरजाही अजून भागलेल्या नाहीत.आम्ही या गावच्या समस्या जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
आम्ही रघुचीवाडी या गावात पोहचलो तेव्हा सकाळच्या कामासाठी सगळ्यांची लगबग दिसून आली. पाण्यासाठी डोक्यावर घागरी घेऊन गावाबाहेर असलेल्या शेतातून महिला पाणी आणत होत्या. रस्त्याची दुरवस्था झाली होती. सार्वजनिक नळाला पाणी नाही. गावात असलेल्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीची दयनीय अवस्था झालेली. गावातून फेरफटका मारला तेव्हा तिथल्या महिला,ग्रामस्थ आणि विदयार्थी यांच्याशी संवाद साधला. पाणी भरण्यासाठी होणारी ही दूरवरची पायपीट असह्य होत असून यामुळे महीलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे.शिवाय घर कामाला उशीर होतो म्हणून शेती आणि इतर कामाला उशीर होतो अशी महिलांनी प्रतिक्रिया दिली. गावात सोयीसविधांनी युक्त दवाखाना नाही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णाना घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते.दत्ता करवर यांनी दिलेल्या माहिती नुसार मंत्री दौऱ्यावर येतात गावाची पाहणी करतात आश्वासन देतात आणि निघून जातात. गावाच्या समस्या कागदोत्रीच रखडल्या आहेत. गावातील शाळेत प्रत्येक वर्गाला वेगळ्या शिक्षकाची नेमणूक केली गेलेली नाही. एकच शिक्षक पहिली ते चौथीपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवतात.
ही फक्त एका राघूच्यावाडीची परिस्थिती नसून जाधववाडी आणि केकस्थळवाडीची सुद्धा हीच परिस्थिती आहे.
एकीकडे भारताने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला .मात्र भारतातल्या काही भागात अजुनही मूलभूत गरजा भागवण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागतोय.राज्याच्या राजकारणात रोज नवी उलाढाल होतेय. आणि या सगळ्यांमध्ये सामान्य माणसाचे हक्क मात्र पायदळी तुडवले जात आहेत. शिक्षण ,पाणी ,आरोग्य, रस्ते यासारख्या अनेक समस्यांना राज्यांतील कितीतरी लोकं आजही तोंड देताना दिसत आहेत.अशाच एका प्रश्नाचा तिढा अजूनही कायम आहे.धाराशिव नगरपालिकेमध्ये सामील झालेल्या राघूचीवाडी, जाधववाडी व केकस्थळवाडी या ग्रामीण भागाच्या समस्या अजूनही सुटलेल्या नसून ग्रामस्थांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विकासाची आश्वासन देऊन अनेक वर्ष उलटून गेली, पण प्रत्यक्ष मात्र गावाचा विकास रखडलेला आहे.
असा सुरू आहे लढा
धाराशिव नगर परिषदेतून मुक्त करून ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा अशी मागणी करणारी याचिका ग्रामस्थांनी दाखल केल्यानंतर प्रत्येक वाडीला स्वतंत्र ग्रामपंचायत उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तरीही प्रत्यक्ष मात्र तिन्ही वाड्यांमध्ये एकही ग्रामपंचायत अजून अस्तित्वात आलेली नाही. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटलेला नसल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना दूरपर्यंत पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.
पाण्याची टाकी धोकादायक
राघुचीवाडी ग्रामपंचायतच्या टाकीची दुरावस्था झाली असून वर्दळीच्या ठिकाणी असलेली ही टाकी पडण्याच्या मार्गावर आहे. ही ग्रामपंचायतची टाकी धोकादायक असून ती पाडून नवीन टाकी बांधण्यात यावी अशी ग्रामस्थाची मागणी आहे. गावात आमदार निधीतून दोन मोठे रस्ते झाले. परंतु गावातून जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था अजूनही तशीच्या तशीच आहे. चिखल,खड्डे यातून नागरिकांना कसरत करावी लागत आहे. जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गाला शिकवण्यासाठी एकाच शिक्षकाची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांची तारेवरची कसरत चालू आहे. या संपूर्ण प्रश्नाकडे सरकारने लक्ष द्यावे गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मंत्री दौऱ्यावर येतात पाहणी करतात आणि आश्वासने देऊन निघून जातात हा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. गावातील समस्येचा प्रत्येक प्रश्न घेऊन ग्रामस्थ मंत्रालयापर्यंत जाऊन आले परंतु प्रत्यक्षात एकही प्रश्न सोडवला गेला नाही. यामुळे ग्रामस्थ वैतागलेले आहेत. गावातील समस्या गाव पातळीवर सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. ग्रामस्थांच्या याप्रश्नाकडे सरकार कधी गांभीर्याने लक्ष देईल व या गावांना स्वतंत्र ग्रामपंचायत केव्हा बहाल करेल याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. गांधजींनी खेड्याकडे चला असा मूलमंत्र दिला मात्र आज खेड्यांची अवस्था इतकी दयनीय झालीय की मुलभूत सुविधा मिळत नसल्याने गावातील लोक शहराकडे स्थलांतर करत आहेत. गावांचा विकास नाही म्हणून गावात रोजगाराच्या संधी नाहीत.