मनोज देशपांडे / लोहारा,जि.धाराशिव
लोहारा तालुक्यातील सास्तुर परिसराला बुधवारी (दि.५) दुपारी ४ वाजून ३२ मिनिटाच्या सुमारास १.८ रिस्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोहारा तालुक्यातील सास्तुरसह परिसरात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत.बुधवारी दुपारी ४ वाजून ३२ मिनिटाच्या सुमारास लोहारा तालुक्यातील सास्तूर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. जमिनीतून गूढ आवाज आला. यामुळे जमीन हादरली. सास्तूर, एकोंडी (लो) होळी, उदतपूर, सालेगांव, तोरंबा, हराळी, रेबेचिंचोली या परिसरालाही भूकंपाचा धक्का जाणवला. दरम्यान, लातूर येथील भूकंपमापक केंद्रात १.८ रिस्टरस्केलची नोंद झाली असल्याची माहिती वैज्ञानिक सहाय्यक के. जी. परदेशी यांनी दिली.
९३ च्या कटू आठवणींना उजाळा : ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप झाला होता. यामध्ये १० हजारापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भूकंप म्हटले की येथील नागरिकांना ३० सप्टेंबरचा काळ समोर उभा राहतो.