सलग 45 वर्षे खासदार, आणि 3- 3 आमदार, आता पक्षाकडे एकही आमदार नाही,
चव्हाण म्हणातात, मी पक्ष सोडणार नाही, बदनामी कराल तर माफी नाही
चंद्रसेन देशमुख / आरंभ मराठी
धाराशिव ; वाऱ्याची दिशा बदलावी तशी माणसं,विचार आणि तत्व बदलत आहेत. राजकारणाकडे उद्योग,व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी झाली आहे. त्यामुळे जिकडे सत्ता तिकडे नेता,अशी स्थिती आहे. काँग्रेसला तर 1951 पासून 1991 पर्यंत सुमारे 45 वर्ष या जिल्ह्याने खासदार दिले. काही वेळा पक्षाचे तीन तीन आमदार राहिले. स्थानिक स्वराज्य संस्थेतही काँग्रेसची हवा होती पण आता ही हवा बदलली आणि नेतेही. सत्ता बदल होत असतोच. पण याकाळात नेतेही पक्षात राहायला तयार नाहीत. 11 वेळा खासदार दिलेल्या या जिल्ह्यात आता पक्षासाठी बलाढ्य नेता राहिला नाही, बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर जेष्ठ नेते मधुकर चव्हाण यांच्या एकूणच भूमिकेवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळेच शेतकरी कामगार पक्षापाठोपाठ आता काँग्रेसची स्थिती बिकट होणार का,असा प्रश्न पडत आहे.
सलग 45 वर्षे काँग्रेसचे 11 वेळा खासदार
1951 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत राघवेंद्र दिवाण यांच्या माध्यमातून उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाने काँग्रेसचा पहिला खासदार निवडून दिला. ही निवडणूक शेतकरी कामगार पक्षविरुद्ध काँग्रेस अशी झाली होती. या निवडणुकीत पक्षाने मतदारसंघावर घेतलेला ताबा सुमारे 45 वर्ष म्हणजे 1991 पर्यंत कायम राहिला. व्यंकटराव नळदुर्गकर,तुळशीराम पाटील, तुकाराम शृंगारे, त्र्यंबक सावंत, अरविंद कांबळे, अशा पक्षाच्या एकाहून एक अधिक बलाढ्य नेत्यांनी मतदारसंघावर सत्ता गाजवली. अर्थातच विधानसभा, विधान परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावपातळीवर सुद्धा काँग्रेस पक्षाचा प्रचंड दबदबा होता. उलटपक्षी शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांसाठी ज्या पक्षाचा उदय झाला, अशा शेतकरी कामगार पक्षाला उस्मानाबादच्या मतदारांनी एकदाही लोकसभा मिळू दिली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे महत्त्व आणि दबदबा अधोरेखित होतो. उस्मानाबाद लोकसभेचा इतिहास पाहिला तर 1951 मध्ये राघवेंद्र दिवाण पहिले खासदार म्हणून काँग्रेस पक्षाकडून निवडून आले. त्यानंतर 1957 मध्ये व्यंकटराव नळदुर्गकर, 1962, 1967 आणि 1971 असे 3 वेळा तुळशीराम पाटील लोकसभेवर निवडून गेले. 1977 मध्ये तुकाराम शृंगारे, त्यानंतर 1980 मध्ये त्र्यंबक सावंत, 1984,1989 आणि 1991 या तिन्ही लोकसभा निवडणुकीत अरविंद कांबळे निवडून आले. हा 45 वर्षाचा संपूर्ण काळ काँग्रेसच्या खासदारांचा राहिला. त्यानंतर 1996 मध्ये शिवसेनेचे शिवाजी कांबळे निवडून आले. 1998 मध्ये पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा काँग्रेसच्या अरविंद कांबळे यांना संधी मिळाली. 1999 मध्ये शिवसेनेच्या शिवाजी कांबळे यांना दुसऱ्यांदा उस्मानाबादकरांनी खासदार बनवले. 2004 मध्ये कल्पनाताई नरहिरे शिवसेनेच्या खासदार झाल्या. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.पद्मसिंह पाटील, 2014 मध्ये शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड आणि 2019 मध्ये ओमराजे निंबाळकर शिवसेनेकडून निवडून आले. लोकसभेच्या 74 वर्षाच्या कार्यकाळात सर्वाधिक 45 वर्षाचा कार्यकाळ आणि 11 खासदार काँग्रेस पक्षाचे राहिले. पाच वेळा शिवसेनेचे खासदार तर एक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार या मतदारसंघात निवडून आले. वास्तविक पाहता काँग्रेसने इतकी वर्ष सत्ता मिळवली तरी आता मात्र वाऱ्याची दिशा बदलली आहे. काँग्रेस पक्षाला दररोज नवनवे हादरे बसत आहेत. गेल्या महिन्यात माजी राज्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षातून दोन वेळा आमदार राहिलेल्या पाटील यांच्या बाहेर पडण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यापाठोपाठ दुसरा धक्का माजीमंत्री आणि पाच वेळा आमदार राहिलेले तुळजापूरचे काँग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाण यांनी दिला आहे. त्यांनी चार दिवसांपूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरात भेट घेऊन मुलगा सुनीलराव चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाची तारीख आणि वेळ निश्चित केली होती. सुनील चव्हाण यांच्यापाठोपाठ मधुकरराव चव्हाणही काँग्रेस पक्षातून बाहेर पडतात की काय अशी चर्चा आहे. त्यामुळे ज्येष्ठ मंडळींनी पक्षातून बाहेर पडणं काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.मात्र,चव्हाण यांनी आपण शेवटपर्यंत काँग्रेस पक्ष सोडणार नाही असे स्पष्ट करतानाच माझी बदनामी करणाऱ्यांना माफी नाही असा इशारा दिला आहे.
नेत्यांची अगतिकता, सत्ता तिकडे नेता
सध्या जिल्ह्यात काँग्रेसच्या ताब्यात एकही विधानसभा नाही तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतूनही काँग्रेसचा दबदबा कमी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांची अगतिकता वाढत असून, त्यामुळे सामान्य कार्यकर्तेही सैरभैर आहेत. अशा काळात सत्तेच्या दिशेने वारे वाहू लागले आहे. बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी पक्षाशी फारकत घेतली तर नवी पिढी काँग्रेसच्या विचाराकडे आकर्षित होईल का, की सत्तेच्या बाजूनेच राजकारणाची दिशा राहील, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.मात्र पक्षाने अनेक पदे,संधी,सन्मान देऊनही ज्येष्ठ नेते पक्षातून बाहेर पडत असल्याने सामान्य कार्यकर्त्यांना संताप आल्यावाचून राहत नाही.
निष्ठा वगैरे नाही, राजकारणात चालते ठेकेदारी
एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाची जिल्ह्यात सत्ता होती. जिल्ह्यातील जवळपास 90% स्थानिक स्वराज्य संस्था शेकापच्या ताब्यात होत्या. तुळजापूर नगरपरिषद तर 2004 पर्यंत पक्षाने ताब्यात ठेवली. मात्र आता 20 वर्षात हा पक्ष स्पर्धेतही राहिला नाही. किंबहुना पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. तत्व आणि विचार या पलीकडे पक्षाने सत्तेचा कधीही विचार केला नाही. सर्वसामान्य माणूस, कष्टकरी, शेतकरी यांना केंद्रबिंदू मानून विचारावर चालणारा हा पक्ष आता इतिहासजमा होतो की काय अशी परिस्थिती आहे. वर्तमान राजकारणात मात्र पक्षांना विचारधारा राहिलेली नाही. पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनाही आता राजकारणातून पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवायची आहे. अर्थार्जन चालले तरच निष्ठा वगैरे..पक्षात काम करायचं म्हणजे व्यवसायाचं काय, असा प्रश्न केला जातो.मग नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना ठेकेदारी मिळावी, अशी अपेक्षा असते. मात्र ज्यांच्याकडे सत्ताच नाही त्यांना ठेकेदारीचे कार्यकर्ते जगवणे अशक्य आहे. अशीच अवस्था काँग्रेस पक्षाची झाली आहे . सत्ता नसल्यामुळे ठेकेदारी मिळवून कार्यकर्ते सांभाळणं आवाक्याबाहेर आहे.नेत्यांनाही पुढच्या पिढीला काहीतरी मिळवून द्यायचं आहे. या पार्श्वभूमीवर जिकडे सत्ता तिकडे नेता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नेतेच रात्रीतून पक्ष बदलतात, कार्यकर्त्यांचा दोष काय?
गेल्या काही वर्षात विशेषतः महाराष्ट्रातील राजकारण नवे वळण घेत आहे. तत्व, विचार,निष्ठा यापलीकडे जाऊन नेते, लोकप्रतिनिधीही रात्रीतून पक्ष बदलून विचारांशी तडजोड करत आहेत.5 वर्षापूर्वी असलेली विचारधारा एकाही पक्षाकडे उरलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा नेत्यांवरचा विश्वास उडत आहे. तत्व आणि निष्ठा हे शब्द नेत्यांच्या भाषणात आले की कार्यकर्ते चुळबुळ करत असतात. त्यामुळे नेत्यांनी निष्ठा शिकवावी अशी परिस्थिती राहिली नाही,असे कार्यकर्ते जाहीरपणाने सांगतात.