चंद्रसेन देशमुख / धाराशिव
उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्यांपैकी 4 उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता रिंगणात 31 उमेदवार उरले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक उमेदवार रिंगणात असलेली ही पहिली निवडणूक ठरणार आहे. दरम्यान,ही निवडणूक दोन बॅलेट युनिटवर होईल. त्यावर 31 उमेदवार आणि नोटाचे एक बटण, अशी 32 नावे असतील. क्रमवारीनुसार राष्ट्रीय, नोंदणीकृत पक्ष आणि मराठी अद्याक्षरानुसार बॅलेट युनिटवर प्रथम क्रमांकावर कोणाचे नाव येणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. अर्ज भरलेल्या विक्रम काळे, बाळकृष्ण शिंदे,रहिमोद्दीन काझी आणि अरूण जाधवर या चार उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली.त्यामुळे आता 31 उमेदवार रिंगणात आहेत. उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीत प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात असून, गेल्यावर्षी उमेदवारांची संख्या केवळ 14 होती.
अर्ज मागे घेतल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, निवडणुकीच्या प्रचाराची खरी सुरूवात मंगळवारपासून होणार आहे. प्रचारात आता एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठणार आहे. नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांची आद्याक्षसरानुसार बॅलेट युनिटवर क्रमानुसार नावे घेतली जातात. त्यानुसार उमदेवारांचा क्रम आज कळणार आहे.
हे आहेत रिंगणातील उमेदवार
अर्चनाताई पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), ओमप्रकाश राजेनिंबाळकर (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), संजयकुमार वाघमारे (बहुजन समाज पार्टी), आर्यनराजे किसन शिंदे (राष्ट्रीय समाज दल), भाऊसाहेब आंधळकर (वंचित बहुजन आघाडी), नेताजी गोरे (देश जनहित पार्टी), नवनाथ दुधाळ (विश्व शक्ती पार्टी), नितेश पवार (हिंदराष्ट्र संघ),ॲड.विश्वजीत शिंदे (आदर्श संग्राम पार्टी), शामराव पवार(समनक जनता पार्टी),शेख नौशा इकबाल(स्वराज्य शक्ती सेना), सिध्दीक इब्राहिम बौडीवाले(ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन), ज्ञानेश्वर कोळी(समता पार्टी), अर्जून सलगर (अपक्ष), उमाजी गायकवाड(अपक्ष),काका कांबळे(अपक्ष), काकासाहेब खोत (अपक्ष), गोवर्धन निंबाळकर( अपक्ष), नवनाथ उपळेकर(अपक्ष), नितीन गायकवाड(अपक्ष),ॲड.भाऊसाहेब बेलुरे(अपक्ष),नितीन भोरे (अपक्ष), मनोहर पाटील(अपक्ष), योगिराज तांबे(अपक्ष), राजकुमार पाटील(अपक्ष), राम शेंडगे(अपक्ष), विलास घाडगे(अपक्ष), शायनी जाधव(अपक्ष), समीरसिंह साळवी(अपक्ष),सोमनाथ कांबळे (अपक्ष) आणि हनुमंत बोंदर( अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहेत.
1951 मध्ये होते दोनच उमेदवार, काँग्रेसने जिंकली लोकसभा
उस्मानाबाद लोकसभेसाठी 31 उमेदवार रिंगणात असण्याची ही पहिलीच वेळ असून, त्यामुळे निवडणूक विभागाला दोन बॅलेट युनिटचा वापर करावा लागणार आहे. उस्मानाबाद लोकसभेच्या इतिहासात पहिल्या म्हणजे 1951 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राघवेंद्र दिवाण आणि शेतकरी कामगार पक्षाचे नरसिंगराव देशमुख हे दोनच उमेदवार रिंगणात होते. 3 लाख, 73 हजार 951 मतदार असलेल्या निवडणुकीत 51.89 टक्के मतदान झाले होते. त्यात दिवाण निवडून आले होते. दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे व्यंकटराव नळदुर्गकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई उध्दवराव पाटील यांच्यात लढत झाली होती. त्यातही काँग्रेसचे उमेदवार नळदुर्गकर निवडून आले होते. त्यानंतर 1962 पासून उमेदवारांची संख्या वाढू लागली. या निवडणुकीत 3 उमेदवार रिंगणात उतरले. 2014 मध्ये सर्वात जास्त 27 उमेदवारांनी लोकसभा लढविली होती. 2019 मध्ये म्हणजे गेल्या निवडणुकीत केवळ 14 उमेदवार रिंगणात होते.
आता प्रचाराची रणधुमाळी
लोकसभेसाठी खऱ्या अर्थाने आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. यावेळीही पारंपारिक अर्थात एकाच कुटुंबातील राजकीय लढाई दिसत आहे. अर्चनाताई पाटीलविरूध्द खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातील खरा सामना रंगणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांचा करिष्मा कसा चालणार, एमआयएमचे उमेदवार कशी लढत देणार, बहुजन समाज पार्टीचा अजेंडा कसा असणार, यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.