जहीर इनामदार /नळदुर्ग
शहरामधून जाणाऱ्या पुणे -हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालक व प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडलेले असताना त्याची दुरुस्ती करण्याऐवजी राष्ट्रीय महामार्ग विभाग टोल जमा करण्यातच दंग आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदाराला महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे, खड्डे चुकविताना दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत, शिवाय तासनतास वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरत आहे.
नळदुर्ग शहराजवळील पुणे-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. नळदुर्गहून उमरगाकडे जाताना जुना जकात नाका ते आलियाबाद पूल दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत,महामार्गाच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे हा महामार्ग सध्या वाहन चालक व प्रवासासाठी जीवघेणा ठरत आहे. हे खड्डे चुकविण्याच्या नादात या ठिकाणी दररोज अनेक अपघात होत आहेत.अपघात झाल्यानंतर या महामार्गावर नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होत आहे. अनेकदा हे खड्डे बुजविण्याचे थातूरमातूर काम करण्यात आल्याने पुन्हा त्याच जागी खड्डे पडत आहेत,खड्डे बुजविण्याची आणि पुन्हा पुन्हा खड्डे पडण्याची मालिका वारंवार सुरु आहे. त्यामुळे खड्ड्याची व्यवस्थित दुरुस्ती व्हावी व पुन्हा त्या ठिकाणी खड्डा पडू नये,असे काम होणे अपेक्षित आहे. हा महामार्ग जीवघेणा ठरत असतानाही राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. २ मे रोजी या खड्ड्यामुळे या ठिकाणी दोन तीन अपघात झाले आहेत. गुरुवारी (दि.८) रात्री झालेल्या एका अपघातामध्ये तर एका शिक्षकाचा पाय निकामी झाला आहे, अशी गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली असताना राष्ट्रीय महामार्ग विभाग मात्र टोल वसुली करण्यात दंग आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासचे कामही गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे. मध्यंतरी या कामाला गती आली होती मात्र सध्या हे काम पुन्हा एकदा मंदावले आहे. जोपर्यंत बायपास रोड चालू होत नाही,तोपर्यंत नळदुर्ग शहराजवळील महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी होतच राहणार आहे.त्यामुळे संबंधित ठेकेदाराने इतर काम बाजूला ठेवून प्रथम बायपासचे काम पूर्ण करून बायपास रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न करावा. नळदुर्ग शहराजवळील महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे तत्काळ व कायमस्वरूपी बुजविण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला द्यावेत,अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांनी केली आहे. खड्डे चुकविण्याच्या कारणावरून किंवा वाहनांना बाजू देण्याच्या कारणावरून दररोज या ठिकाणी दुचाकी चालक व मोठ्या वाहन चालकांमध्ये खटके उडत आहेत, पावसाळ्यापूर्वी या मार्गाची पूर्णतः डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.