आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, मालमत्ता धारकांचे प्रचंड नुकसान करणारा आणि अर्थव्यवस्था ठप्प केलेला विषय.आता हा विषय सुटण्याच्या मार्गावर आहे. कारण वर्ग-2 च्या जमिनी वर्ग-1 मध्ये कायम ठेवण्याची मागणी केल्यानंतर यासंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देत 2 आठवड्यात विषय मार्गी लावण्याचा शब्द दिला आहे.त्यासाठी नेमलेल्या पाठक समितीकडून तातडीने अहवाल मागवून घेतला जाईल,असे सांगण्यात आले. यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी विखे पाटील यांची भेट घेतली होती.
साळुंके आणि केदार यांनी धाराशिव जिल्ह्यातील इनाम जमिनी, मदतमास जमिनी, खिदमत मास जमिनी, सिलिंग जमीन, कुळ जमीन व महार वतन जमीन वर्ग-1 मध्ये कायम ठेवण्याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन परिस्थिती अवगत केली.त्यासाठी मंत्र्यांनी अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या पाठक समितीला ( मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड) एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश दिले होते.मात्र अद्यापपर्यंत सदरील विषयाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे सदरील सर्व जमीन वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये कायम करण्याबाबत तत्काळ निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदरील विषयांमध्ये एक महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी समस्या मिटेल,असा विश्वास साळुंके आणि केदार यांनी व्यक्त केला आहे.
काय केली मागणी ?
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी यासंदर्भात महसूलमंत्री विखे पाटील यांना निवेदन देऊन प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील इनाम जमिनी, मदत मास, खिदमत मास, सिलींग, कुळ जमिनी व महार वतन जमिनी वर्ग-१ मध्ये कायम ठेऊन सदर जमिनी खालसा करुन घ्याव्यात व नजराणा व दंडाची रक्कम रद्द करावी.