आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.28) बलात्काराचे तीन गुन्हे दाखल झाले असून, यामुळे महिलांच्या सुरक्षेचा आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सोमवारी जिल्ह्यातील लोहारा, बेंबळी आणि नळदुर्ग या तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये लोहारा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात तालुक्यातील एका गावातील अठरा वर्षीय मुलीवर 2022 आणि 2023 असे दोन वर्षे एका मुलाने लैंगिक अत्याचार केला. गावातील एका तरुणाने मुलीला माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्यासोबत बाहेर चल नाहीतर तुझ्या भावास मारुन टाकीन अशी धमकी देवून तिला बळजबरीने मोटर सायकलवर बसवून नेले. झाडीत घेवून जावून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुझ्या भावास जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली. पिडीत तरुणीने 28 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-376, 376(2)(एन), 506 सह पोक्सो कलम 4, 6 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या प्रकरणात तुळजापूर तालुक्यातील एका गावातील 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केला आहे. 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी पीडित महिलेला व तिच्या मुलीला गावातील तीन तरुणांनी वाईट उद्देशाने झोंबाझोंबी करुन ओढून नेले. त्या महिलेला त्यातील एका तरुणाने तुझ्या मुलीचे लग्न माझ्या भावा सोबत का लावून देत नाही असे म्हणून तिला घराच्या बाजूला अंधारात ओढत नेवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पिडीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-376, 376(2)(एन), 506 सह पोक्सो कलम 4, 6 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तिसऱ्या प्रकरणात धाराशिव तालुक्यातील एका गावातील एकवीस वर्षीय मुलीवर 27 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता गावातील एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. पिडीत तरुणीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम-69 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.एकाच दिवशी महिला अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून, दोनच दिवसांपूर्वी शिराढोण पोलीस ठाण्यात देखील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.