प्रतिनिधी / वाशी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीसांनी मोठी कारवाई केली असून, पत्याच्या क्लबवर छापा मारून तब्बल 25 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपींना वाशी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मोजदाद सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार वाशी शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील लक्ष्मी रोडवर एका पत्र्याच्या शेडमध्ये तसेच जुने बांधकाम असलेल्या ठिकाणी पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार मोठा बंदोबस्त घेऊन पोलिसांनी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास छापा मारला.शहरातील सर्वात मोठी कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली असून,या आरोपीमध्ये वाशी शहरातील काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याचे समजते.त्यामुळे राजकीय नेत्यांकडून कारवाईमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र अत्यंत शिताफीने कारवाई सुरू केली आहे.