पाळत ठेवून चोरट्यांनी डाव साधला
प्रतिनिधी / धाराशिव
वेळा अमावस्येला शेतात पूजा आणि जेवणासाठी गेलेल्या दोन कुटुंबात भर दुपारी घरी चोरी झाल्याची घटना घडली असून,यात सुमारे 3 लाख 66 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, बेंबळी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या बामणी येथील गोवर्धन गणपती डोंगरे( वय 51 वर्षे) हे वेळ आमावस्या असल्यामुळे गुरुवारी सकाळी ते व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून पत्नीच्या वडीलांच्या विठ्ठलवाडी शिवारातील शेतात गेले होते. यादरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने स्वयपाक घरात ठेवलेल्या लोखंडी कपाटातील सोयाबीन विक्रीतून आलेली रोख रक्कम 1 लाख 80 हजार रुपये तसेच पत्नीचे मणी मंगळसुत्र, फुले, झुबे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 2 लाख 40 हजार रुपये किंमतीचा माल चोरुन नेला.गोवर्धन यांच्या तक्रारीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ताकविकी येथील संतोष विनायक जाधव( वय 42 वर्षे) हे वेळ आमावस्या असल्यामुळे गुरुवारी सकाळी ते व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून ताकविकी शिवारातील शेतात पूजा आणि जेवणासाठी गेले होते . यावेळी त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने आत प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटातील रोख रक्कम 34 हजार रुपये व 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 1 लाख 26 हजार रुपये किंमतीचा माल चोरुन नेला. संतोष जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार बेंबळी पोलीस ठाण्यात कलम 454,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही चोरीच्या घटनेत साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.