प्रतिनिधी / धाराशिव
कुणी सी.ए., कुणी व्यवसायिक तर कुणी नोकरदार.सायकलवर समाज जागृतीचे फलक लावून या सगळ्या सहा जणांनी सकाळी सहाच्या ठोक्याला अक्कलकोटच्या दिशेने प्रस्थान केले. जाताना मार्गावरील वेगवेगळ्या गावात त्यांनी प्रबोधन करत व्यसन टाळा, स्वच्छता पाळा, अवयव दान करा, वृक्ष लागवड करा आदी सामजिक संदेश दिले.त्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे गावागावात स्वागत करण्यात आले.
धाराशिव शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सहा जणांनी शनिवारी सकाळी हा उपक्रम पहिल्यांदाच राबवला. दररोज सायकलिंग करणाऱ्या या ग्रुपमधील तरुणांनी सामाजिक जनजागृती करण्यासाठी अनोखी योजना केली . त्यांनी सायकलवरून धाराशिव तेअक्कलकोट परत अक्कलकोट ते धाराशिव असा 200 किलोमिटर प्रवास केला.
यामध्ये सी.ए.महेश मिनीयार, सी. ए.गोरोबा घोडके, सुरज वांजरे, दयानंद सांडसे, रोहन चव्हाण व अमोल लोहार यांचा समावेश होता. त्यांनी अवयव दान, पाण्याची बचत, मुलींचे शिक्षण, रक्तदान, अन्नाची बचत व स्वच्छतेचे महत्त्व असे विविध सामाजिक संदेश देत धाराशिव-अक्कलकोट-धाराशिव असा 200 किलोमीटरचा सायकलचा प्रवास पूर्ण केला. रस्त्यातून जाताना गावोगावी थांबून जनजागृती करत लोकांना या गोष्टींचे महत्त्व पटवून द्यायचा प्रयत्न केला. सोबत रस्त्यात शाळेला भेट दिली विद्यार्थ्यांना व्यायामाचे धडे दिले.त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.या ग्रुपने यापूर्वीही अनेकदा सायकल प्रवासाचे विक्रम केले.