प्रतिनिधि | मुंबई
दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली. त्यानंतर आता काँग्रेस अॅक्शन मोडवर आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर आता महाविकास आघाडी मधील तिसऱ्या क्रमांकावर असलेली काँग्रेस आता पहिल्या क्रमांकावर आली आहे. मोदी लाटेमुळे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस बॅकफूटवर गेली होती. पण आता काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) सोबत घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी वेणूगोपाल यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना फोन करून युतीसंदर्भात प्राथमिक चर्चा करून साद घातली आहे.
२०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रातील (Maharashtra) ताकद सर्वांनी अनुभवली आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला होता. त्यामुळे राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच काँग्रेस सरचिटणीस यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवर प्राथमिक युती संदर्भात चर्चा केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिसाद दिल्याची माहिती आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही बैठकीच्या काही फेऱ्या पार पडल्या असून आपली युती पुढे कशी नेता येईल याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र काही कारणांमुळे तसे होऊ शकले नाही.पण यावेळी काँग्रेसने स्वत:हून प्रकाश आंबेडकरांना फोन केल्याने वंचितचा महाविकास आघाडीतील प्रवेश होण्याची शक्यता पुन्हा वाढली आहे.