प्रतिनिधी / मुंबई
कोकण विभागात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, २० जुलै रोजी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे.
सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी यास अनुसरून त्यांच्या स्तरावर आजच आदेश काढून सर्व संबंधित शालेय आस्थापनेस कळवावे, जेणेकरून शाळा मुलांना व पालकांना वेळेमध्ये माहिती मिळेल असा शासन आदेश संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन यांनी काढला आहे.
अतिवृष्टीमुळे सुरक्षितस्थळी हलविलेल्या नागरिकांना भोजन, शुद्ध पेयजलासह मूलभूत सुविधा द्याव्यात
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
मुंबई; भारतीय हवामान विभागाने कोकणातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे. पावसामुळे सुरक्षितस्थळी हलविलेल्या नागरिकांना भोजन, शुद्ध पेयजल मिळेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुंबईसह राज्यात काही ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज सायंकाळी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत विविध सूचना दिल्या.मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. यापासून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. या नागरिकांची भोजन, शुद्ध पेयजलासह, निवाऱ्याची व्यवस्था करावी. शेजारील मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावे. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवावा. स्थानिक प्रशासनाने सतर्क आणि दक्ष राहावे. पुराचा धोका असलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात. पशुधनाचीही काळजी घेण्यास सांगावे.