गजानन जाधव, मुख्याध्यापक, (ता.रोहा,जिल्हा रायगड)
”सर, हा पहा करटूलाचा वेल, न इथं दुधखुडीच्या शेंगा,पेवा, गरगटची भाजी,धानी, भारंगी … ” मुलं उत्साहानं सांगत होती. मी काही नावंही ऐकली नव्हती, अशा अनेक रानभाज्यांची ओळख मुलांनी मला करून दिली. तेवढ्यात ६ वीचा महेश एका दाट जाळीत गेला आणि म्हणाला, ”सर सर, इकडे या तुम्हाला काही तरी दाखवतो. त्याने टोकदार काठी घेतली आणि जमीन खोदायला सुरुवात केली आणि अळिंबी(मशरूम) काढली. म्हणाला, याची भाजी खूप चांगली लागते. मग थोड्या अंतरावरचं एक सुंदर फूल मुलांनी दाखवलं. सांगितलं, हे जंगली हळदेचं फुल आणि त्यानंतर थोडं जमीन खोदून मला जंगली हळद कशी असते ते दाखवली.
- ही गोष्ट या शैक्षणिक वर्षातल्या श्रावण महिन्यातली. १५ तारखेला शाळा सुरू झाली की साधारण महिन्याभरात कोकणात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आषाढ-श्रावण महिन्यात जंगलात दुर्मिळ रानभाज्या आणि औषधी वनस्पतींचा बहर येतो. जंगलातील या बाबींचे विद्यार्थ्यांना ज्ञान असते. त्यांच्या याच ज्ञानाला उपयोग करून, मुलांनी स्वतः जंगलात जाऊन भाज्या शोधून आणल्या. माहिती संकलन करून रानभाज्यांचे प्रदर्शन भरवले. प्रदर्शनला पालक, ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या रानभाज्यांना मागणी येऊ लागली. विद्यार्थ्यांनी भाज्यांची विक्री केली आणि जमा झालेल्या रकमेतून शैक्षणिक साहित्य खरेदी केले. सुट्टीच्या दिवशी मुलं पालकांसोबत भाज्या विकू लागली.
- आमचे विद्यार्थी शहरीकरणापासून खूप दूर. त्यांना चार भिंतीबाहेरच्या शिक्षणाची अधिक आवड. भाषा, गणित, इंग्रजीपेक्षा त्यांना कला, कार्यानुभवाची अधिक आवड. हाच धागा पकडून जून ते ऑक्टोबर काळात विविध उपक्रम शाळेने केले. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायीकरणाची बीजे रोवली. हे उपक्रम राबवताना आम्ही शिक्षकांनी आमची भूमिका निरीक्षणापुरती ठेवत मुलांमधल्या सुप्त गुणांना, त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला वाव कसा मिळेल, हे पाहिले.
- इथली आदिवासीवाडी अतिदुर्गम क्षेत्रात. तालुक्यापर्यंत जाण्यासाठी वेळ आणि पैसे खूप खर्च करावे लागतात. सणांच्या खरेदीसाठी शहराचीच वाट धरावी लागते. मुलांनी ठरवलं यंदा राख्या आपणच करूया. कमी खर्चात अतिशय सुंदर राख्या त्यांनी तयार केल्या आणि बाजारभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून दिल्या. गणेशमूर्ती खरेदीसाठीही बरेच पैसे लागतात. मुलांनी शून्य खर्चात मातीपासून सुंदर गणेशमूर्ती घडवल्या. त्यांची विक्री करून व्यावसायिक शिक्षणाचे धडे गिरवले. या उपक्रमातून मातीपासून विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी मुलांना चालना मिळाली.
- यंदाच्या दिवाळीत मुलांनी एक रुपया खर्चात आकाशकंदील तर केलेच आणि प्लॅस्टिक बाटल्यांच्या पुनर्वापराचा आदर्श घालून दिला. मुलांनी परिसरातल्या रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या गोळा केल्या. कटरच्या साहाय्याने त्याला विशिष्ठ छेद देऊन त्यात फुगा टाकून दोऱ्याने बांधून आकाशकंदील केले. यातून प्लॅस्टिक, पर्यावरण हे विषय आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवू शकलो.
- आमचे विद्यार्थी आणि पालक बहुतांश करून जंगलात जाणारे. त्यांना स्वसंरक्षणासाठी गलोल लागते. बाजारात त्याची किंमत १०० रुपये. मुलांनी ५- १० रुपयात तयार केले, त्याची विक्री करून शैक्षणिक खर्चासाठी पैसे मिळवले. आम्ही फक्त बाजारातून रबर आणून दिले तर मुलांनी परिसरात जाऊन गलोलसाठी लागणाऱ्या V आकाराच्या छोटया फांद्या आणल्या. त्या वाळवून त्याला रंग देऊन कल्पकतेने सुंदर अशी गलोल बनवली. आम्ही पालकांना, लोकांना आवाहन केलं की गलोल बाजारातून विकत घेण्याऐवजी मुलांकडून घ्या. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.
- या उपक्रमांचा परिणाम म्हणजे अनेक सामाजिक, घरगुती कारणानं शाळेकडे पाठ फिरवणारे विद्यार्थी नियमित शाळेत येऊ लागले. शाळाबाह्य मुलांना या उपक्रमांमुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता आलं. भाषा,गणित,इंग्रजी या विषयाच्या भीतीमुळे शाळेत न रमणाऱ्या मुलांना या उपक्रमांतून खूप आनंद मिळू लागला व त्यांना शाळा आवडू लागली. पालकांनाही शाळा आवडू लागली. इथला हंगामी स्थलांतराचा विषय गंभीर होता. पण या उपक्रमांमुळे यंदा १६ विद्यार्थी आईबाबांसोबत न जाता वाडीतच थांबले.
- २०२० पासून कोविड आणि नंतर निसर्ग चक्रीवादळात शाळा पडल्यानं शाळेचा प्रवास खडतर झाला होता. आता सीएसआरमधून DRT-Anthea Aroma Chemicals Pvt Ltd या कंपनीने सुसज्ज शाळा बांधून दिली आहे. संपर्क संस्था आणि नवी उमेदच्या वाचकांनी आम्हाला साहाय्य दिले. कधी मंदिरात, तर कधी माळावर शिक्षण घेत २०२३ पासून या सुसज्ज शाळेत मुलांचा प्रवास स्थिरावला आहे.
- सध्या शाळा ६ वी पर्यंत असून गेल्या तीन वर्षात ५७ पटसंख्या असलेल्या शाळेची संख्या ९९ पर्यंत पोहचली आहे. सहाय्यक शिक्षक हर्षा काळे आणि बाळू चव्हाण यांच्या साथीने मुलांच्या आवडीप्रमाणे शिक्षणाचा प्रवास सुरु ठेवला आहे.शाळेतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास कसा होईल, ते सुजाण नागरिक कसे होतील, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.