प्रतिनिधी / इटकळ
सोलापूर- हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर इटकळ गावाजवळील पुलावर हैदराबादहुन सोलापूरच्या दिशेने जाणारा ट्रक (एम.एच.१२ एक्स ९४६८) १० ते १२ फुट पुलाखाली कोसळल्याने यात चालक व क्लिनर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इटकळ औट पोस्टचे हेड कॉन्स्टेबल शिंदे,गायकवाड,जमादार व गावातील नागरिक यांनी घटनास्थळावरील वाहतूक सुरळीत केली व जखमींना उपचारासाठी सोलापूरला पाठवले.
इटकळ येथे यापुर्वीही पुलावर वारंवार अपघात झाले आहेत. महामार्गाच्या संबंधित अधिकारी, कंपनी ठेकेदारांकडून पूलाचे अर्धवट काम पूर्ण केले जात नाही.या पुलावर ना कटडे आहेत, ना डिव्हायडर.त्यामुळे वाहनांचा अपघात झाला की वाहन पुलावरुन १०/१२फुट खोल खड्ड्यात पडते. त्यामुळे लवकरात लवकर या फुलाांच्या कटड्याचे काम व्हावे अशी मागणी इटकळच्या नागरिकातून होत आहे. सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही काही ठिकाणी पुर्ण झालेले नाही. यामुळे ठिकठिकाणी पुल व सर्व्हिस रोडच्या अर्धवट कामामुळे आपघाताचे प्रमाण वाढले आहे.मात्र संबंधित रोड अधिकारी व कंपनी ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत आहेत.
जुन्या पुलाला नवा मुलामा
अनेक ठिकाणी नवीन पुलाचे काम झाले असून, यापूर्वी दोन ठिकाणी पूल खचला तर बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याच्या कामादरम्यान काही ठिकाणी जुन्या पुलाची तात्पुरती डागडुजी केली आहे.रस्ता चौपदरीकरण, जुन्या महामार्गावर पडलेली खड्डे, रस्त्याच्या दुतर्फा असलेली साइडपट्टी एक ते दीड फूट खोल खचल्याने वाहनांचे अपघात होत आहेत.