आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यातील येडशी गावात दिवाळीच्या सणादरम्यान काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. येथील करंडे किराणा स्टोअर्स अँड गिफ्ट वेअर या दुकानासह घराला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण येडशी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येडशी येथील करंडे यांच्या किराणा दुकानाला आणि त्याला लागून असलेल्या घराला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने दुकानासह घरालाही आगीने वेढले. आगीची तीव्रता एवढी होती की, रात्रीपासून सकाळपर्यंत ग्रामस्थ, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस प्रशासन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते.
मात्र, या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तम त्रिंबक करंडे, चंद्रकला उत्तम करंडे, गोविंद उत्तम करंडे, ज्योती गोविंद करंडे, गायत्री गोविंद करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे अशी मृतांची नावे आहेत.
दिवाळीच्या आनंदोत्सवाच्या काळातच करंडे कुटुंबावर काळाने घाला घातल्याने गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. संपूर्ण कुटुंबातील सहा जणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने येडशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.










