आरंभ मराठी / धाराशिव
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्यावर सुमारे २३ हजार मतांची आघाडी घेतली आहे. मात्र, पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. या निवडणुकीतील पहिल्या तीन क्रमांकांवरील उमेदवार धाराशिव जिल्ह्याचे असल्याने संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष जिल्ह्याकडे लागले आहे.
डॉ. प्रतापसिंह पाटील यांची आघाडी पाहता त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निकाल स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे, अपक्ष उमेदवार रविराज साबळे पाटील यांनी २० हजारांहून अधिक मते मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यांच्या मतांची संख्या लक्षवेधी ठरली असून, तरुण मतदारांचा पाठिंबा या निकालातून अधोरेखित होत आहे.
या निवडणुकीत विद्यमान आमदार सतीश चव्हाण, डॉ. प्रतापसिंह पाटील आणि रविराज साबळे पाटील हे तिन्ही प्रमुख उमेदवार धाराशिव जिल्ह्याचे असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात निकालाची चर्चा रंगली आहे.
डॉ. प्रतापसिंह पाटील यांची आघाडी कायम राहते की दुसऱ्या पसंतीची मते निकालाचे चित्र बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच विजयावर शिक्कामोर्तब होणार असले, तरी या निवडणुकीने धाराशिव जिल्ह्याचे नाव संपूर्ण मराठवाड्यात चर्चेत आणले आहे.










