आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत असून, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आता विरोधी पक्षाकडून देखील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत आहे. आज शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे धाराशिव दौऱ्यावर आले आहेत. तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांची अवस्था पाहताना मनात कापरे भरत असल्याचे सांगत शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. शिवसेना पक्ष शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र म्हणून त्यांच्या पाठीशी उभा आहे.
कोणत्याही बँकेकडून कर्जवसुलीच्या नोटिसा दिल्या जात असतील तर संबंधित बँकेचे नाव शिवसेनेच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना थेट कळवा. त्या बँकांना आम्ही सरळ करू, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी पीक हातातून गेल्याने निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती, कर्जाचा वाढता बोजा आणि शासनाकडून अपेक्षित असलेल्या मदतीबाबत आपली व्यथा मांडली. दुष्काळाच्या प्रश्नावर आम्हाला राजकारण करायचे नाही. मात्र, राज्य सरकारने या संकटाच्या काळात जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर शिवसेनेचे लक्ष असून ही मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात पोहोचेपर्यंत पक्षाकडून त्यावर बारीक लक्ष ठेवले जाईल, असेही त्यांनी सांगितले. ‘मायबाप शेतकरी हा अन्नदाता आहे. त्यामुळे मी हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती करतो की, मनात कोणताही वाईट विचार आणू नका. या संकटाला आपण सर्वजण मिळून जिद्दीने सामोरे जाऊया,’ असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले.
यावेळी खानापूर परिसरातील काही शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना निवेदने दिली. यातील अनेक शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी केली.
या मागणीचा शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले. दुष्काळाची तीव्रता पाहता शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी शासनाच्या उपाययोजनांवर लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष मदत त्यांच्या खात्यावर अथवा हातात पोहोचली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दौऱ्यात विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे, शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते. खानापूर येथील पाहणीनंतर आदित्य ठाकरे हे लोहारा तालुक्यातील आष्टा मोड परिसरातील दुष्काळग्रस्त भागाचीही पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.









