आरंभ मराठी / धाराशिव
मागील तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या धाराशिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर अखेर कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी विभागाने यासंदर्भातील शासनादेश आज प्रसिद्ध केला असून, मुंबई येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात डीबीटी विशेषज्ञ म्हणून कार्यरत असलेले सागर खटकाळे यांची धाराशिवचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू असलेल्या कृषी विभागाच्या कारभाराला आता कायमस्वरूपी अधिकारी मिळाला आहे. धाराशिवचा कृषी विभाग मागील काही काळापासून २२ कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आहे. या प्रकरणात कृषी विभागातील १४ अधिकारी निलंबित झाल्याने विभागाच्या प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. त्यातच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा कायमस्वरूपी अधिकारी उपलब्ध नसल्याने अडचणीत आणखी भर पडली होती.
प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी पदभार स्वीकारण्यास एकही अधिकारी तयार नव्हता. त्यानंतर राजेंद्र साळवे यांनी काही काळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. मात्र, त्यांच्यावर भररस्त्यात शाही फेक करण्याची घटना घडल्याने त्यांनीही या पदाचा कार्यभार सोडला. त्यानंतर जवळपास महिनाभर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाची खुर्ची रिक्तच राहिली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर अधिकारी नसल्याने कृषी विभागातील अनेक महत्त्वाच्या कामकाजावर परिणाम झाला. शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजना, प्रशासकीय निर्णय आणि विभागीय कामकाजाला यामुळे अडथळे निर्माण झाले होते. अखेर तंत्र विभागाचे प्रमुख प्रवीण चोपडे यांनी काही दिवसांपूर्वी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. मात्र, कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने विभागातील अनिश्चितता कायम होती. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने आज शासनादेश काढून सागर खटकाळे यांची धाराशिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. खटकाळे हे सध्या मुंबई येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात डीबीटी विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी परभणी जिल्ह्यात उप कृषी अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.
तसेच मुंबई येथे पोखरा योजनेसाठी काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. धाराशिव जिल्ह्यात कृषी क्षेत्राचे मोठे महत्त्व असून, सध्या शेतकरी विविध नैसर्गिक संकटे, पीकविमा, कृषी निविष्ठा, अनुदान आणि विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्नांना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत सागर खटकाळे यांच्या प्रशासकीय तसेच योजनांच्या अंमलबजावणीतील अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या कृषी विभागाला होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










