आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यातील आळणी गावातील वाढत्या गावगुंडांच्या दहशतीला कंटाळून सुमारे ४०० ते ५०० ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले. गावातील शालेय मुली, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले असून, गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून आळणी गावात काही गावगुंडांची दहशत वाढली आहे. शालेय मुलींची छेड काढणे, ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण मारहाण करणे, गावठी दारू, गुटखा यांसारख्या अवैध धंद्यांना संरक्षण मिळत असल्याचे गंभीर आरोप ग्रामस्थांनी केले आहेत. त्यामुळे गावातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अनेकवेळा धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने अखेर थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून न्याय मागण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्वतः कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्वीकारावे आणि नागरिकांची कैफियत ऐकावी, अशी मागणी केली. मात्र, पोलीस अधीक्षकांनी जे काही निवेदन असेल ते कार्यालयात येऊन द्यावे, असे सांगितल्यामुळे तणाव वाढला.
यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलीस अधीक्षकांनी खाली येऊन प्रत्यक्ष नागरिकांचे म्हणणे ऐकेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
या आंदोलनामुळे काही काळ पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, प्रशासनाकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गावातील वाढत्या गुन्हेगारीवर तातडीने अंकुश ठेवून संबंधित गावगुंडांवर कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी एकमुखी मागणी आळणी ग्रामस्थांनी यावेळी केली. पोलीस अधीक्षक यांनी काही प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले असून, गावातील विद्यार्थिनी पोलिस अधीक्षक रितू खोकर यांच्या कक्षात गेल्या आहेत. या आंदोलनात ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्य देखील उपस्थित आहेत.












