आरंभ मराठी / धाराशिव
प्रस्तावित नागपूर–गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा किंवा त्याची अलाईनमेंट बदलून सुपीक शेती वाचवावी, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या महामार्गामुळे हजारो शेतकरी, ग्रामस्थ आणि त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याने शासनाने या प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित ८५६ किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील हजारो हेक्टर सुपीक, बागायती आणि बारमाही ओलिताखालील शेती बाधित होणार आहे. अनेक पिढ्यांपासून शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन धोक्यात येणार असून शेतीचे अपरिमित नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, नागपूर ते रत्नागिरी दरम्यान आधीच महामार्गाची सुविधा उपलब्ध असून त्याचा अपेक्षित वापर होत नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नव्याने मोठ्या खर्चाचा महामार्ग उभारण्यासाठी सुपीक शेती संपादित करणे आणि शेतकऱ्यांना विस्थापित करणे अन्यायकारक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गाच्या अनुभवाचा उल्लेख करत, अशा प्रकारच्या महामार्गांमुळे नैसर्गिक जलवाहिन्या आणि पाण्याचे प्रवाह बाधित होतात. परिणामी शेतीचे नुकसान होऊन सुपीक जमीन खारपड होण्याचा धोका वाढतो, अशी भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव पूर्णपणे रद्द करावा किंवा पर्यायी अलाईनमेंट निश्चित करून शेतीचे नुकसान टाळावे, अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील १७ गावातून शक्तिपीठ महामार्ग जात असून, या महामार्गाला शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून विरोध केला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी हा विषय घेतल्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या विरोधाला बळ मिळणार आहे.










