एका नेत्याला खुश करण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आणू नका
धाराशिव | आरंभ मराठी
लातूर–उस्मानाबाद–बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी आता थेट समाज माध्यमांवर भूमिका मांडण्यास सुरुवात केली असून, त्यात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस निखिल हुंडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून लिहिलेले खुले पत्र चर्चेत आले आहे.
हुंडेकर यांनी आपल्या पत्रात कोणाचेही नाव न घेता निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावनांना न्याय देण्याची मागणी केली आहे. पक्ष अडचणीत असताना गावोगावी फिरून संघटना उभी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या त्यागाची दखल घेतली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. एका नेत्याला खुश करण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आणू नका, अशी भावनिक साद घालत त्यांनी पक्षासाठी दीर्घकाळ संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यालाच संधी मिळावी, असे मत मांडले आहे.
पत्रात त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी आयुष्य झिजवलेल्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करत, बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी देताना मूळ कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित होत असल्याची खंत व्यक्त केली आहे. या पत्रातील मजकूर आणि त्यानंतर समाज माध्यमांवर सुरू झालेल्या चर्चेमुळे भाजपमधील अस्वस्थता समोर येत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी या नाराजीची दखल घेऊन कोणताही राजकीय निर्णय घेतात का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर निर्माण झालेली ही नाराजी आगामी निवडणुकीत काही परिणाम घडवून आणते का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








