आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरासह जिल्ह्यात आज सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांनी अचानक प्रचंड मोठा गूढ आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी हा आवाज स्फोटासारखा किंवा आकाशात काहीतरी घडल्यासारखा जाणवला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या वेळी काही वेळ जमीनही हादरली.
या घटनेनंतर काही काळ नागरिकांमध्ये संभ्रम आणि घबराट पसरली. अनेकांनी घराबाहेर येत परिसरात काय घडले याची चौकशी केली. काही भागांमध्ये घरांच्या काचा थरथरल्याचेही नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. हा आवाज भूकंपामुळे झाला का, याची पडताळणी संबंधित यंत्रणांकडून केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद अद्याप मिळालेली नाही.
तथापि, भूगर्भशास्त्र विभाग आणि हवामान खात्याशी संपर्क साधून अधिकृत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारचे आवाज कधी कधी आकाशातील ध्वनीलहरी, सुपरसॉनिक विमानांची हालचाल किंवा वातावरणातील अचानक दाबबदलामुळेही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी अधिकृत अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या गूढ आवाजाचे नेमके कारण काय, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








