आरंभ मराठी / धाराशिव
शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संस्थाचालक असणाऱ्या महिलेने शाळेतील शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची बनावट टीसी आणि कागदपत्रे काढून शिपायाच्या नावे आलेली 2 लाख 87 हजार रुपये पगाराची रक्कम परस्पर लाटली असल्याचा प्रकार कळंब तालुक्यातील देवळाली या गावात उघडकीस आला आहे.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी श्रीमती मिरा लक्ष्मण जाधवर, मुख्याध्यापक तथा संस्थाचालक व लक्ष्मण गोपाळराव जाधवर (दोघे रा. देवळाली, ता. कळंब) यांनी दिनांक 11 एप्रिल 2017 ते 23 नोव्हेंबर 2021 दरम्यान कळंब तालुक्यातील देवळाली येथील जागृती विद्यामंदीर देवळाली शाळेत सेवक पदावर काम करणाऱ्या जी.बी. राउत यांची बनावट टी सी दाखवून राऊत यांच्या नावावरील वेतन परस्पर हडप केले. या काळात शाळेचे शिपाई म्हणून राऊत यांच्या नावावर आलेले 2 लाख 87 हजार 361 रुपये एवढे वेतन शासनाकडून घेवून त्याचा अपहार करुन शासनाची फसवणुक केली. यावरुन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी या बाबत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद रिट याचिकेच्या (क्र 8014/2022) निर्णयानुसार दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फिर्यादी दत्तात्रय शिवाजी लांडगे (वय 42 वर्षे, व्यवसाय उपशिक्षणधिकारी) यांनी दिनांक 15 ऑगस्ट रोजी
दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पोलीस ठाण्यात भा.दं.वि.सं. कलम 420, 409, 465, 467, 471, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.